भारताचा २५०वा सामना
By admin | Published: September 28, 2016 07:09 AM2016-09-28T07:09:54+5:302016-09-28T07:09:54+5:30
कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आता शुक्रवारी कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल.
ईडनवर दुसरी कसोटी : मायदेशातील सर्वाधिक कसोटी सामने या मैदानावर खेळले
नवी दिल्ली : कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आता शुक्रवारी कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल. त्या वेळी टीम इंडियाचा मायदेशातील हा २५० वा कसोटी सामना असेल.
भारताने मायदेशात जास्तीत जास्त सामने स्वातंत्र्यानंतर खेळले आहेत. १९४७ पूर्वी भारताने मायदेशात केवळ तीन सामने खेळले होते. त्यात दोन सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिला सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी इंग्लंडविरुद्ध मुंबई जिमखाना मैदानावर खेळला गेला होता. त्या लढतीत भारताला ९ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लाला अमरनाथने पदार्पणाच्या लढतीत शतक झळकावले तो हाच सामना होता.
मायदेशात भारताने ५० वा कसोटी सामना फेबु्रवारी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध दिल्लीमध्ये खेळला होता. या लढतीत हनुमंत सिंग यांनी पदार्पणात १०५ धावा फटकावल्या होत्या. मन्सूरअली खान पतौडी यांनी या लढतीत नाबाद द्विशतकी (२०३) खेळी केली होती. ही लढत अनिर्णीत संपली होती.
भारताने मायदेशात १०० वा कसोटी सामना नोव्हेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळला होता. ही लढत अनिर्णीत राहिली होती. १५० वा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मार्च १९९३ मध्ये दिल्लीमध्ये खेळला गेला होता. त्या लढतीत विनोद कांबळीने २२७ धावांची खेळी केली होती आणि भारताने एक डाव १३ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा मायदेशातील २०० वा कसोटी सामना योगायोगाने कोलकातामध्येच खेळला गेला होता. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान मार्च २००५ मध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत राहुल द्रविडने दोन्ही डावांत (११० व १३५) शतके झळकावली होती. भारताने या लढतीत १९५ धावांच्या फरकाने मोठा विजय साकारला होता. जर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर एकप्रकारे भारताची ही विजयाची हॅट््ट्रिक ठरणार आहे. भारताने मायदेशातील सर्वाधिक कसोटी सामने ईडनगार्डन्सवर खेळले आहेत, हे विशेष.
कोलकाताच्या या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा सामना भारताचा या मैदानावरील एकूण ४० वा कसोटी सामना आहे. आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या ३९ सामन्यांपैकी भारताने ११ जिंकले आहेत, तर ९ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतासाठी दिल्लीचे फिरोजशाह कोटला आणि चेन्नईचे एम. ए. चिदंबरम स्टेडियम लकी ठरले आहेत. या दोन्ही मैदानांवर भारताने प्रत्येकी १३ सामने जिंकले आहेत. भारताने दिल्लीत ३३, तर चेन्नईत ३१ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने मायदेशात एकूण २१ मैदानांवर कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यातील ९ मैदाने अशी आहेत, की जेथे गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कसोटी सामना खेळला गेलेला नाही.
भारताने मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध (५५) खेळले आहेत. त्यात १५ सामन्यांत विजय मिळवला, तर १३ सामने गमावले. त्यानंतर आॅस्ट्रेलिया (४६ कसोटी, १९ विजय, १२ पराभव), वेस्ट इंडिज (४५ सामने, ११ विजय, १४ पराभव), पाकिस्तान (३३ सामने, ७ विजय, ५ पराभव) आणि न्यूझीलंड (३२ सामने, १४ विजय, २ पराभव) या संघांचा क्रमांक आहे. भारताने आतापर्यंत कसोटी खेळणाऱ्या संघांपैकी बांगलादेशविरुद्ध अद्याप मायदेशात कसोटी सामना खेळलेला नाही. (वृत्तसंस्था)
काही कर्णधारांची कामगिरी...
- कर्णधारांबाबत विचार
करता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात सर्वाधिक ३०
सामने खेळले. त्यात २१ सामन्यांत विजय मिळवला,
तर केवळ तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.
- अझहरच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात २० सामने खेळले. त्यात १३ सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
- गांगुलीने मायदेशात २१ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. त्यात १० सामन्यांत विजय मिळवला, तर ३ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.
- सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या २९ कसोटी सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ७-२ अशी आहे.
- मन्सूरअली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात खेळलेल्या २७ कसोटी सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय मिळवला, तर ९ सामने गमावले.
च्कपिलदेव यांनी मायदेशात २० कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण संघाला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला, तर चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
८८ सामन्यांत विजय; तर ५१ सामन्यांत पराभूत
भारताने आतापर्यंत मायदेशात २४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ८८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर ५१ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना टाय झाला तर १०९ सामने अनिर्णीत संपले. विदेशात भारताने २५१ सामने खेळताना ४२ जिंकले, तर १०६ सामने गमावले. १०३ सामने अनिर्णीत संपले.
या लढतीसह भारत मायदेशात २५० कसोटी सामने खेळणारा तिसरा संघ ठरणार आहे. इंग्लंडने मायदेशात सर्वाधिक ५०१ सामने खेळले आहेत. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा (४०४) क्रमांक आहे. वेस्ट इंडिज (२३७) चौथ्या अणि दक्षिण आफ्रिका (२१७) पाचव्या क्रमांकावर आहे.