भारताची अर्जेंटिनावर ३-२ ने मात
By admin | Published: October 14, 2015 11:56 PM2015-10-14T23:56:29+5:302015-10-14T23:56:29+5:30
भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत बुधवारी अर्जेंटिनावर ३-२ ने विजय नोंदविला.
जोहोर बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत बुधवारी अर्जेंटिनावर ३-२ ने विजय नोंदविला.
भारतीय आक्रमक फळीने सुरुवातीपासून आक्रमक धोरण राबवित आघाडी मिळविली. अर्जेंटिनाच्या बचाव फळीला भारताचे हल्ले थोपविण्यात अपयश आल्याने तिसऱ्या मिनिटाला पहिला गोल झाला. अरमान कुरेशी याने पहिला आणि गुरजंतसिंग याने आठव्या मिनिटाला दुसरा गोल नोंदविला.
अरमान, गुरजंत, सुमितकुमार आणि परविंदरसिंग यांनी अर्जेंटिनाची बचावफळी खिळखिळी केली होती. भारताला ३४ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर मात्र व्यर्थ गेला. उत्तरार्धात अर्जेंटिनाला ३९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मेइको सासेला याने गोल नोंदविला. प्रत्युत्तरात भारतानेदेखील ५० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवित गोल केला. नीलकांत शर्मा याच्या गोलमुळे ३-१ असे अंतर होते. भारताचा पुढील सामना मलेशियाविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)