भारताच्या ९५ सदस्यांचा संघाची निवड
By Admin | Published: June 29, 2017 12:45 AM2017-06-29T00:45:26+5:302017-06-29T00:45:26+5:30
भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला ९५ सदस्यांच्या संघाची निवड केली.
नवी दिल्ली : भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला ९५ सदस्यांच्या संघाची निवड केली. विशेष म्हणजे, भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यजमान भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. भारताच्या संघात ४६ महिला खेळाडू आहेत.
कलिंगा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या निर्धाराने भारताने आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे सर्व खेळाडू लंडन येथे आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. दरम्यान, मरुजुआना सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरलेला भालाफेक खेळाडू दविंदर सिंग कांग यालाही संघात स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेक़ ‘आम्ही या प्रकरणी गंभीर विचार केला होता. दविंदरला निलंबित करण्यात आले नसल्याने आम्ही त्याची संघात वर्णी लावली. जर या प्रकरणी नाडाने काही निर्देश दिले आणि त्याला स्पर्धेदरम्यान निलंबित करण्यात आले, तर मात्र त्याला संघाबाहेर ठेवण्यात येईल,’ असे भारतीय अॅथलेटिक्स संघाचे (एएफआय) सचिव सी. के. वॉलसन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)