जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीला ब्राँझ पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 05:24 PM2018-02-24T17:24:04+5:302018-02-24T17:24:04+5:30
ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुडा रेड्डीने पदक विजेती कामगिरी केली आहे.
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुडा रेड्डीने पदक विजेती कामगिरी केली आहे. ब्राँझ पदक मिळवणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. स्लोव्हानियाच्या जासा कायससेल्फला सुवर्ण आणि ऑस्ट्रेलियाच्या इमायली व्हाइटहेडला रौप्यपदक मिळाले. अरुणाने 13.649 गुणासह कांस्यपदक मिळवले, अरुणा 22 वर्षांची आहे.
याच प्रकारातील अन्य भारतीय महिला स्पर्धक प्रणाती नायकला 13.416 गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अरुणा रेड्डी कराटे प्रशिक्षक असून तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. 2005 साली जिम्नॅस्टिक्समध्ये अरुणाने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले. 2014 साली कॉम्न वेल्थ गेम्सच्या पात्रता फेरीत वॉल्ट अॅपराटसमध्ये अरुणाला 14 वे स्थान मिळाले होते. आशियाई स्पर्धेत नववे स्थान मिळाले होते.
2017 साली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अरुणाला वॉल्ट प्रकारात सहावे स्थान मिळाले होते. 2010 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आशिष कुमारने जिम्नॅस्टिक्समध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक्ससाठी 52 वर्षानंतर प्रथमच दीपा करमाकर जिम्नॅस्टसाठी पात्र ठरली होती. त्यावेळी तिथे थोडक्यात तिचे पदक हुकले होते.