पी.व्ही सिंधूची विजयी घौडदोड; सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:51 PM2022-07-16T13:51:42+5:302022-07-16T13:53:25+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने पुन्हा एकदा शानदार खेळी करून अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे.
नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने पुन्हा एकदा शानदार खेळी करून अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. सिंधूने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यफेरीत जपानच्या सायना कावाकामीवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर ३०० जेतेपद पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणज ३२ मिनिटं चाललेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तिने २१-१५, २१-७ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, सिंधू आता २०२२ च्या हंगामातील तिच्या पहिल्या सुपर ५०० विजेतेपदापासून फक्त १ पाऊल दूर आहे. विशेष म्हणजे आठ टूर्नामेंटनंतर तिने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ती मार्च २०२२ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये योनेक्स स्विस ओपनच्या अंतिम फेरीत पोहचली होती आणि त्यामध्ये तिने विजय देखील मिळवला होता. या सामन्यापूर्वी सिंधूचा जपानच्या खेळाडूविरुद्धचा विक्रम २-० असा होता आणि हा सामना २०१८ मध्ये चायना ओपनमध्ये खेळला गेला होता.
सिंधूची फायनलमध्ये धडक
कधीकाळी विश्व चॅम्पियन राहिलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीला चितपट करून विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात कावाकामीने अनेक चुका केल्या ज्यामुळे तिला पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत प्रहार करण्यास सुरूवात केली आणि अखेर फायनलचे तिकिट मिळवले. भारताच्या सिंधूने ब्रेकपर्यंत तीन गुणांची आघाडी घेत वर्चस्व कायम ठेवले होते.
FINALS FOR SINDHU 🔥👑@Pvsindhu1 puts up exemplary performance to comfortably beat 🇯🇵's S Kawakami 21-15, 21-7 in just 31 minutes and cruise through to the summit clash of #SingaporeOpen2022 ✅
— BAI Media (@BAI_Media) July 16, 2022
Go for 🥇 champ!#SingaporeOpenSuper500#IndiaontheRise#Badmintonpic.twitter.com/douunXYItC
सिंधूने दोन व्हिडीओ रेफरल्सही जिंकून १८-१४ अशी आघाडी घेतली. नंतर कावाकामीच्या दोन मोठ्या चुकांमुळे सिंधूचा मार्ग सुखकर झाला आणि तिला सहज गेम जिंकता आला. दुसऱ्या गेममध्ये देखील कावाकामीला नियंत्रण ठेवता आले नाही ती ०-५ अशा फरकाने पिछाडीवर राहिली.
जपानच्या खेळाडूला नमवून मिळवला विजय
विशेष म्हणजे सिंधूने संपूर्ण गेमदरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला अडकवून ठेवले आणि संयमाने तिच्या चुकांची वाट पाहिली. ११-४ च्या ब्रेकनंतर सिंधूने लगेचच १७-५ अशी आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमणाचे जपानच्या खेळाडूकडे कोणतेच उत्तर नव्हते. ज्यामुळे भारताच्या सिंधूला १९-६ अशी आघाडी घेता आली. बेसलाइनचा सिंधूचा शॉट जपानच्या खेळाडूने नेटवर मारल्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर पडली आणि सिंधूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.