फिफा रँकिंगमध्ये भारताची मोठी झेप
By admin | Published: April 6, 2017 08:20 PM2017-04-06T20:20:24+5:302017-04-06T20:20:24+5:30
कम्बोडिया तसेच मॅनमारविरुद्ध विजयाची नोंद करताना भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेत १०१ वे स्थान पटकवले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 : कम्बोडिया तसेच मॅनमारविरुद्ध विजयाची नोंद करताना भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेत १०१ वे स्थान पटकवले आहे. गेल्या २० वर्षांतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भारतीय संघ मागच्या महिन्यात १३२ व्या स्थानी होता. कम्बोडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात ३-२ ने आणि मॅनमारविरुद्ध १-० ने विजय नोंदविताच भारताला ३१ स्थानांचा लाभ झाला.
याआधी १९९४ साली भारतीय संंघाने ९४ व्या, १९९३ मध्ये ९९ व्या, आणि १९९६ मध्ये १०० वे स्थान मिळविले होते. अ.भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव कुशाल दास यांनी
संघाचे कौतुक करीत यशाचे श्रेय खेळाडू आणि सहयोगी स्टाफला दिले. नवे रँकिंग मिळविल्यानंतर भारतीय संघाला ७ जून रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना लेबनॉनविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर एएफसी आशिया चषक पात्रता फेरीत १३ जूनला घरच्या मैदानावर किर्गिस्तानविरुद्ध सामना खेळावा
लागेल.
देदीप्यमान कामगिरी
भारताने गेल्या दोन वर्षांत खूप सुरेख कामगिरी केली आहे. या दरम्यान भूतानविरुद्ध अनधिकृत सामन्यासह १३ सामन्यात ११ विजयांची नोंद केली. भारतीय संघाने ३१ गोल नोंदविले.
सांघिक प्रयत्नांचे फळ
राष्ट्रीय संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी या कामगिरीला सांघिक प्रयत्नांचे फळ संबोधले. नवे खेळाडू खेळविणे आणि प्रतिस्पर्धा तयार करणे ही मोठी प्रक्रिया असून आमचा संघ योग्य दिशेने प्रयत्नात असल्याचे मला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. कॉन्स्टेनटाईन हे फेब्रुवारी २०१५ ला दुसऱ्यांदा कोच बनले. त्यावेळी भारत १७१ व्या स्थानावर होता. मार्च २०१५ मध्ये संघ १७३ व्या स्थानावर घसरला. पण त्यानंतर सलग चांगल्या कामगिरीसह रँकिंग सुधारण्याचा त्यांंनी प्रयत्न केला.