इंग्लंडच्या धावांचा डोंगराला भारताचे सावध प्रत्युत्तर
By admin | Published: November 10, 2016 12:46 PM2016-11-10T12:46:13+5:302016-11-10T17:27:40+5:30
इंग्लंडने उभारलेल्या 537 धावांच्या डोंगराला प्रत्युत्तर देताना भारताने सावध सुरुवात केली आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 10 - इंग्लंडने उभारलेल्या 537 धावांच्या डोंगराला प्रत्युत्तर देताना भारताने सावध सुरुवात केली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि गौतम गंभीर यांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 63 धावा फटकावल्या आहेत.
इंग्लंडचा पहिला डाव 537 धावांवर आटोपल्यानंतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सावध पवित्रा घेतला. मुरली विजय आणि गौतम गंभीरने संयमी खेळ करत दिवसाच्या शेवटच्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गंभीर 28 आणि विजय 25 धावांवर खेळत होते. भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप 474 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी कालच्या 4 बाद 311 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर दुसऱ्या दिवशीही इंग्लिश फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली. रुटपाठोपाठ (124) मोईन अली (117) आणी बेन स्टोक्सने केलेल्या 128 धावांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. मोईन अलीने दुस-या दिवशीही फॉर्म कायम राखत शतक पूर्ण केले, मात्र शमीने त्याला बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला.
त्यानंतर स्टोक्स आणि बेअरस्टो यांची अर्धशतकी भागीदारीमुळे इंग्लंडने 400 धावांचा टप्पा ओलांडला. स्टोक्सही इतर दोन सहका-यांप्रमाणे भारतीय गोलंदाजांना धुवत 128 धावांची खणखणीत खेळी करत असताना इंग्लंडचे इतर फलंदाज पटापट तंबूत परतले. इंग्लंडला 500 धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर स्टोक्स बाद झाला. त्यानंतर अन्सारीला 32 धावांवर पायचीत करत मिश्राने इंग्लंडचा डाव 537 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून जाडेजाने 3 तर शामी , यादव आणि अश्विनने प्रत्येकी 2 आणि मिश्राने 1 बळी टिपला.