हॉकीमध्ये भारतीयांचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: June 23, 2017 12:48 AM2017-06-23T00:48:39+5:302017-06-23T00:48:39+5:30
धोकादायक मलेशिया संघाकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला.
लंडन : धोकादायक मलेशिया संघाकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान खेळाचे प्रदर्शन केला. मात्र सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये केलेला निराशाजनक खेळ
आणि अत्यंत कमजोर बचाव यामुळे भारतीय संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले.
सामन्यात भारतीयांनी तब्बल ७ पेनल्टी कोर्नर वाया घालावले. मलेशियाने तीन पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत सामना जिंकला. राजा रहीमने १९व्या मिनिटाला आणि ४८ व्या मिनिटाला गोल केला. तसेच, तेंगकु ताजुद्दिन याने एक गोल करुन मलेशियाला महत्त्वपुर्ण विजय मिळवून दिला. भारताकडून रमनदीप सिंगने २४व्या आणि २६व्या मिनिटाला गोल करुन भारताचे आव्हान कायम ठेवण्यासाठी झुंज दिली.
दरम्यान, या विजयासह मलेशियाने पुढील वर्षी भारतात
होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्याचवेळी, गेल्या दोनपेक्षा कमी महिन्यात भारताला मलेशियाकडून दुसऱ्यांदा पराभवाचे तोंड पहावे लागले. गेल्याच
महिन्यात अझलन शाह स्पर्धेतही भारताला मलेशियाकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता.
(वृत्तसंस्था)