‘वन-डे’तही भारताचे आव्हान कडवे : मॉर्गन
By Admin | Published: January 10, 2017 01:47 AM2017-01-10T01:47:47+5:302017-01-10T01:47:47+5:30
भारताविरुद्ध आगामी तीन वन-डे सामन्यांची मालिका आमच्यासाठी कडवे आव्हान ठरणार असल्याचे मत मर्यादित षटकांच्या
मुंबई : भारताविरुद्ध आगामी तीन वन-डे सामन्यांची मालिका आमच्यासाठी कडवे आव्हान ठरणार असल्याचे मत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या इयोन मॉर्गन याने व्यक्त केले. मालिकेपूर्वी संघाला आज, मंगळवारी आणि १२ जानेवारीला सराव सामने खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला.
भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना मॉर्गन म्हणाला, ‘विदेशात खेळताना वेगळेच आव्हान असते आणि अशा आव्हानांना सामोरे जाण्यास प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. भारत हे खेळण्यासाठी आणि मालिका विजय साकारण्यासाठी चांगले स्थान आहे. कारण येथे स्थानिक संघ चांगली कामगिरी करतो, असा अनुभव आहे.’
इंग्लंडला येथे यापूर्वी वन-डे सामन्यांच्या तीन मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. २००८-०९ आणि २०१२ मध्ये इंग्लंडला ०-५ ने, तर २०१३ मध्ये २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला १५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर उभय संघांदरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
दरम्यान, मॉर्गन याने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धोनीने अलीकडे संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन म्हणाला, ‘महेंद्रसिंग धोनी निश्चितच चांगला कर्णधार होता. तो प्रदीर्घकाळ संघाचा कर्णधार होता. २०११ च्या विश्वकप स्पर्धेत त्याचे नेतृत्व उल्लेखनीय ठरले होते. आकडेवारी सर्वकाही स्पष्ट करणारी आहे.’
कसोटी कर्णधार विराट कोहली आता सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. मॉर्गन पुढे म्हणाला, ‘विराट कसोटी संघाचे नेतृत्व करीत असल्यामुळे त्याचा त्याला लाभ मिळाला. विराट निश्चितच चांगला खेळाडू आहे; पण जोपर्यंत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातील बारकावे कळत नाही.’
इंग्लंड संघ चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेपर्यंत पूर्णपणे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. इंग्लंडच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जून महिन्यात होणार आहे. आगामी मालिका अधिक महत्त्वाची असल्याचे मॉर्गन म्हणाला. (वृत्तसंस्था)