भारतापुढे सलामीला इंग्लंडचे आव्हान
By admin | Published: June 24, 2017 02:10 AM2017-06-24T02:10:41+5:302017-06-24T02:10:41+5:30
अलीकडच्या कालावधीमध्ये कामगिरीत सातत्य राखणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आज
डर्बी : अलीकडच्या कालावधीमध्ये कामगिरीत सातत्य राखणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी सलामी लढतीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार व यजमान असलेल्या इंग्लंड संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अलीकडच्या काळात भारताची कामगिरी चमकदार ठरली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या गेलेल्या चौरंगी स्पर्धेत यजमान संघाचा पराभव करीत जेतेपद पटकावले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कामगिरीत सातत्य राखेल आणि स्पर्धेत विजयी सुरुवात करेल, अशी आशा आहे.
भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता.
मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता.
भारताच्या आघाडीच्या फळीत दीप्ती शर्मा व पूनम राऊत ही चांगली सलामीची जोडी आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर स्मृती मंदानाने पुनरागमन केले आहे. या व्यतिरिक्त मोना मेश्राम, हरमनप्रीत कौर व वेदा कृष्णमूर्ती यांच्याकडूनही भारताला चांगल्या कामगिरीची आशा आहे.
दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनुभवी सराह टेलरने प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. या व्यतिरिक्त इंग्लंड संघात कर्णधार हिथर नाईट, कॅथरीन ब्रंट, लौरा मार्श व अन्या श्रबसोले या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अन्य लढतींमध्ये न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील लढती रॉबिन पद्धतीने होणार आहेत. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्रााम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिष्ट, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत परवीन.
इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), जॉर्जिया एल्विस, जेनी गुन, अॅलेक्स हर्टली, सराह टेलर, टॅमी ब्यूमोंट, कॅथरिन ब्रंट, डॅनियली हेजेल, बेथ लँगस्टन, लौरा मार्श, अन्या श्रबसोले, नाती साइवर, फ्रान विल्सन, डॅनियली वाइट आणि लौरेन विनफील्ड.