एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: January 6, 2017 01:12 AM2017-01-06T01:12:54+5:302017-01-06T01:12:54+5:30
भारताचा एकेरीतील स्टार टेनिसपटू युकी भांबरीचा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील ४७व्या स्थानी असलेल्या बेनोइत पेयरे विरुध्द सरळ दोन सेटमध्ये पराभव झाला
चेन्नई : भारताचा एकेरीतील स्टार टेनिसपटू युकी भांबरीचा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील ४७व्या स्थानी असलेल्या बेनोइत पेयरे विरुध्द सरळ दोन सेटमध्ये पराभव झाला. या निराशाजनक पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या युकीने ७ ब्रेकपॉइंट गमावले. दुसऱ्याच फेरीत त्याला पेयरेविरुद्ध ३-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, काही गेम जिंकताना त्याने चमकदार खेळ केला खरा, परंतु कामगिरीत सातत्य राखण्यात त्याला अपयश आले. त्याच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत पेयरेने सामन्यात चांगलेच नियंत्रण राखले. याआधी रामकुमार रामनाथन आणि साकेत माइनेनी यांना पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला होता.
अन्य लढतींमध्ये स्पर्धेतील द्वितीय मानांकीत आणि जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या रॉबर्टो बाउतिस्ता याने उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना ब्राझीलच्या रोजेरिओ डी सिल्वाला ६-३, ६-२ असे नमवले. तसेच, अनुभवी मिखाएल युज्नीने देखील विजयी आगेकूच करताना रेंजो ओलिवोला ६-१, ७-५ असा धक्का दिला. (वृत्तसंस्था)