भारताला विजयाच्या 'हॅट्ट्रिक'ची संधी

By admin | Published: July 7, 2016 07:08 PM2016-07-07T19:08:59+5:302016-07-07T19:08:59+5:30

दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू

India's chance of a hat-trick of victory | भारताला विजयाच्या 'हॅट्ट्रिक'ची संधी

भारताला विजयाच्या 'हॅट्ट्रिक'ची संधी

Next

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. ७  : दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू इच्छितो.
भारताने १९५३ पासून विंडीजमध्ये ४५ कसोटी सामने खेळले. त्यात पाच जिंकले, १६ हरले आणि २४ सामने अनिर्णीत राहिले. भारत विंडीज यांच्यात १९४८ पासून आतापर्यंत एकूण ९० कसोटी सामने झाले. त्यात १६ भारताने आणि ३० सामने विंडीजने जिंकले तर ४४ सामने अनिर्णीत राहिले. भारत सध्या विंडीजमध्ये चार सामने खेळणार आहे. या सामन्यांसह भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या ४९९ होणार आहे.

भारताने पहिल्यांदा १९५२-५३ साली विंडीजचा दौरा केला. तेव्हापासून कॅरेबियन भूमीत दहा मालिका खेळल्या आहेत. त्यातील तीन जिंकल्या आणि सात गमविल्या. मागच्या दोन्ही मालिका मात्र भारताने जिंकल्या. सध्याची मालिका खिशात घातल्यास मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधली जाईल. टीम इंडियाने विंडीजमध्ये २००६ साली चार सामन्यांची मालिका १-० ने आणि २०११ मध्ये तीन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. त्याआधी भारतीय संघाने अजीत वाडेकर यांच्या नेतृत्वात १९७१ मध्ये पाच सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती.

२००६ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व राहुल द्रविडकडे आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीकडे होते. १९७५-७६मधील चार सामन्यांच्या मालिकेत तसेच २००२ च्या पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना भारताने जिंकला होता. १९७१ च्या ६ ते १० मार्च या कालावधीत झालेल्या पोर्ट आॅफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत भारत सात गड्यांनी जिंकला. याच सामन्यात महान सुनील गावस्करचे पदार्पण झाले. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी दुसऱ्या डावात ९५ धावांत पाच बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मालिकेतील चार सामने अनिर्णीत संपले.

१९७५-७६ मध्ये पोर्ट आॅफ स्पेनच्या तिसऱ्या कसोटीत ४०३ धावांचे लक्ष्य गाठताना ४ बाद ४०६ धावा करीत विजय साजरा केला. गावस्कर १०२, गुंडप्पा विश्वनाथ ११२, मोहिंदर अमरनाथ ८५ आणि बृजेश पटेलने नाबाद ४९ धावांचे विजयात योगदान दिले.
या ऐतिहासिक विजयाच्या २७ वर्षानंतर २००२ मध्ये भारताला पोर्ट आॅफ स्पेनमध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात ३७ धावांनी तिसरा विजय नोंदविता आला. पहिल्या डावात सचिनने शानदार ११७ तर गांगुली आणि लक्ष्मण यांनी दुसऱ्या डावात क्रमश: ७५ आणि ७४ धावा ठोकल्या. लक्ष्मणने पहिल्या डावातही नाबाद ६९ धावांचे योगदान दिले. जवागल श्रीनाथ आणि आशिष नेहरा यांनी

प्रत्येकी तीन गडी बाद करीत भारताचा शानदार विजय साकार केला. २००६ मध्ये किंग्स्टनच्या सबिना पार्कमध्ये भारताने ४९ धावांनी विजय साजरा केला. कर्णधार द्रविडने पहिल्या डावात ८१ आणि दुसऱ्या डावात ६८ धावा केल्या. सध्याचे कोच अनिल कुंबळे यांनी दुसऱ्या डावात ७८ धावांत सहा गडी बाद केले. त्याआधी हरभजनने १३ धावांत अर्धा संघ बाद केला होता.
२०११ मध्ये सबिना पार्कवर धोनीच्या नेतृत्वात भारताने ६३ धावांनी विजय नोंदविला. रैनाने पहिल्या डावात ८२ आणि द्रविडने दुसऱ्या डावात ११२ धावा ठोकल्या. प्रवीण कुमार आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी सहा बळी घेत सामना फिरविला होता. याच सामन्यात सध्याचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी पदार्पण केले. पाचव्या स्थानावर आलेल्या विराटने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. कर्णधार या नात्याने पाच वर्षानंतर मालिका जिंकण्याची जबाबदारी विराटच्याच खांद्यावर आली. तो कसा विजय खेचून आणतो, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: India's chance of a hat-trick of victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.