Sanjita Chanu : चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:22 PM2023-04-04T13:22:48+5:302023-04-04T13:23:50+5:30
National Anti-Doping Agency : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय वेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Sanjita Chanu । नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीयवेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी डोपिंग टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) चार वर्षांची बंदी घातली आहे. खरं तर संजीता मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या सरावादरम्यान ॲनाबॉलिक स्टेरॉयड-ड्रोस्टॅनोलोन मेटाबोलाइटमुळे संक्रमित आढळली होती, जे जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सीच्या (वाडा) प्रतिबंधित यादीमध्ये आहे.
भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे (IWF) अध्यक्ष सहदेव यादव यांनी संजीतावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, "होय, संजीतावर नाडाने चार वर्षांसाठी बंदी घातली आहे." खरं तर हा संजीतासाठी मोठा झटका मानला जात आहे. तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकले होते, जे काढून घेण्यात आले आहे. संजीताने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय २०१८ मध्ये तिने ५३ किलोचा भार उचलून पदक जिंकले होते.
संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी
दरम्यान, मणिपूरची खेळाडू संजीता चानूकडे बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. पण ती आवाज उठवणार का हे अद्याप स्पष्ट नाही. संजीताने जानेवारीमध्ये पीटीआयशी बोलताना म्हटले होते, "या आधी देखील मला याचा अनुभव आहे. मला माहिती नाही की मी अपील करेन की नाही कारण दोन्ही प्रकरणांमध्ये माझीच हार होईल." लक्षणीय बाब म्हणजे या आधी देखील २०११च्या आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक विजेत्या खेळाडूला डोपिंग संबंधित वादाचा सामना करावा लागला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"