भारताचा मलेशियाविरुद्ध निर्णायक सामना
By admin | Published: May 5, 2017 01:05 AM2017-05-05T01:05:41+5:302017-05-05T01:05:41+5:30
अझलान शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एका विजयाची आवश्यकता असलेला भारतीय संघ शुक्रवारी पूर्ण
इपोह : अझलान शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एका विजयाची आवश्यकता असलेला भारतीय संघ शुक्रवारी पूर्ण आत्मविश्वासाने मलेशियाविरुद्ध लढेल. गतविजेत्या आॅस्टे्रलियाला अंतिम फेरीसाठी केवळ बरोबरीही पुरेशी ठरणार असून, त्यांचा सामना जपानविरुद्ध आहे. एकूणच आॅस्टे्रलियाचा लौकिक पाहता त्यांचा जपानविरुद्धचा विजय केवळ औपचारिकता आहे.
त्याच वेळी मलेशियाविरुद्ध एकही चूक भारताला खूप महागडी ठरू शकते. जर, भारताला अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागले, तर मात्र त्याचा फायदा ब्रिटनला होईल आणि त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. ब्रिटनचा अखेरचा लीग सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ स्पर्धेतील अखेरचा लीग सामना खेळणार असल्याने अंतिम फेरीचे एकूण गणित भारतीयांना माहीत असेल. मात्र, त्याच वेळी गोलसरासरी चांगली असणे आवश्यक असेल, तर अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर्सवर अधिक जबाबदारी येईल. आतापर्यंतच्या सामन्यात मनदीपसिंग आणि आकाशदीपसिंग यांनीच लक्षवेधी कामगिरी केली असून, मनदीपने जपानविरुद्ध शानदार हॅट्ट्रिक
नोंदवली होती. त्याच वेळी जास्तीत जास्त गोल नोंदविण्यासाठी भारताची मदार रूपिंदरपालसिंग आणि हरमनप्रीतसिंग या पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्टवर असेल.
दरम्यान, जागतिक क्रमवारीत आपल्याहून १६ स्थानांनी पिछाडीवर असलेल्या जपानविरुद्ध भारताला झुंजावे लागले होते. त्यात अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी निर्णायक असलेल्या सामन्यात मलेशियासारख्या संघाविरुद्ध खेळावे लागणार असल्याने प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी सर्व खेळाडूंना लक्षपूर्वक खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)
मलेशियाचा संघ खूप चांगला आहे. कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला गृहीत धरता येणार नाही. भलेही जपानने आम्हाला कडवे आव्हान दिले; परंतु आता आम्ही कोणतेही आव्हान घेण्यास सज्ज आहोत.
- रोलंड ओल्टमन्स,
प्रशिक्षक, भारत
टीम इंडियाला विजय आवश्यकच
स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेला यजमान मलेशिया आपल्या प्रतिष्ठेसाठी भारताविरुद्ध दोन हात करेल. जपानविरुद्धच्या सलामी सामन्यात बरोबरी साधल्यानंतर मलेशियाला सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर कांस्यपदकाच्या शर्यतीतूनही मलेशियाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे स्पर्धेची सांगता विजयाने करण्यासाठी मलेशिया भारताला टक्कर देईल.
विश्वविजेता आॅस्टे्रलिया सर्वाधिक १० गुणांसह अव्वल स्थानी आहे. यानंतर भारत, ब्रिटन आणि न्यूझीलंड प्रत्येकी ७ गुणांसह आव्हान टिकवून आहेत. परंतु, गोलसरासरीच्या जोरावर भारताने द्वितीय स्थान पटकावले असून, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्ध विजय आवश्यक आहे. जर न्यूझीलंडने ब्रिटनला नमवले आणि भारत पराभूत झाला, तर न्यूझीलंड अंतिम फेरीत प्रवेश करेल.