World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:40 PM2024-05-20T12:40:34+5:302024-05-20T12:41:50+5:30
Para Athletics Championships : दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Deepthi Jeevanji World Record : भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. दीप्ती जीवनजीने टी-२० मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला. ४०० मीटरचे अंतर अवघ्या ५५.०७ सेकंदात गाठले. यासह भारताच्या दीप्तीने अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला. यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांत ४०० मीटर अंतर गाठले होते.
पण, भारताच्या दीप्तीने हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात शर्यत पूर्ण केल्याने तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर इक्वेडोरच्या लिझानशेला अँगुलोने ५६.६८ सेकंदात अंतर गाठून तिसरे स्थान पटकावले. दरम्यान, या आधी दीप्ती जीवनजीने रविवारी झालेल्या फेरीत ५६.१८ सेकंदाची वेळ घेत अंतर गाठले आणि फायनलचे तिकीट पक्के केले. तिने ५६.१८ सेकंदात अंतर गाठून आशियाई स्तरावर विक्रम केला होता. पण आता दीप्तीने विश्वविक्रम करत सुवर्ण पदक भारताच्या झोळीत टाकले. दीप्तीने वयाच्या २० व्या वर्षी पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. तिने २०२२ मध्ये प्रथम यासाठी धावण्यास सुरुवात केली.
WORLD RECORD ALERT 🚨
— Doordarshan Sports (@ddsportschannel) May 20, 2024
India's🇮🇳 Deepthi Jeevanji wins the GOLD 🥇 medal with a world record time of 55.07 seconds in the women's 400m T20 category race at the World Para Athletics Championships.#ParaAthletics #Kobe2024pic.twitter.com/KalBCmNGtf
खरे तर जागतिक पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण चार पदके आली आहेत. दीप्तीने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. यापूर्वी एक रौप्य आणि दोन कांस्य पदके भारताला मिळाली आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यात अजून किती पदके येतात हे पाहण्याजोगे असणार आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ ला १७ मे पासून सुरुवात झाली असून, ही चॅम्पियनशिप येत्या शनिवारी संपेल.