भारताचा न्यूझीलंडला नमविण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:34 AM2018-04-13T04:34:21+5:302018-04-13T04:34:21+5:30
आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे.
गोल्ड कोस्ट : आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे.
मनप्रीतसिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ब गटाच्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामना ड्रॉ खेळला. त्यानंतर वेल्सवर ४-३ ने आणि मलेशियावर २-१ ने विजय नोंदविला. पाठोपाठ इंग्लंडवर ४-३ असा प्रेक्षणीय विजय नोंदवित गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
पहिल्या तीन सामन्यात आम्ही चांगला खेळ केला नव्हता. इंग्लंडविरुद्ध मात्र बेसिक्सवर कायम राहून अखेरच्या काही क्षणात संयम कायम राखून गोल केले. अखेरपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीवर कायम राहून खेळत आहोत.
>महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत
भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान आॅस्ट्रेलियाकडून ०-१ ने पराभवाचा धक्का बसला. सध्याचा चॅम्पियन आॅस्ट्रेलियासाठी ग्रेस स्टीव्हर्टने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. भारतीय संघ बरोबरीसाठी धडपडत राहिला. चार मिनिटांचा खेळ शिल्लक होता तोच मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी गोलकिपर सविता पुनियाला बाहेर काढून आक्रमक खेळाडूला संधी दिली पण भारतीय संघ संधीचा लाभ घेण्यात कूचकामी ठरला. मोनिकाने दिलेल्या पासवर नवनीतने गोल नोंदविण्याची सोपी संधी व्यर्थ घालविली.