भारताचा मलेशियाविरुद्ध विजयाचा निर्धार
By admin | Published: April 7, 2015 11:28 PM2015-04-07T23:28:15+5:302015-04-07T23:28:15+5:30
पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरलेला भारतीय हॉकी संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध बुधवारी खेळल्या
इपोह : पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरलेला भारतीय हॉकी संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. नवनियुक्त प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या पहिल्या स्पर्धेत भारताला अद्याप विजय मिळविता आलेला नाही. पहिल्या लढतीत कोरियाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर भारताला सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध २-१ ने पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱ्या बाजूचा विचार करताना भारतापेक्षा विश्व मानांकनामध्ये तीन स्थानाने खालच्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाने विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला संघर्ष करण्यास भाग पाडले. या लढतीत मलेशियाला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. मलेशियाला मायदेशातील चाहत्यांना पाठिंबा मिळत असून दडपणाखाली भारतीय संघाची कामगिरी कशी होते, याबाबत उत्सुकता आहे.
भारताची गेल्या दोन्ही सामन्यांतील कामगिरी निराशाजनक नव्हती. चेंडूवर नियंत्रण राखण्याच्या बाबतीत भारतीय संघ वरचढ होता, पण चांगल्या चाली व सर्वोत्तम फिनिशिंग करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. या व्यतिरिक्त दडपणाखाली भारताच्या बचाव फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय स्ट्रायकर विशेषत: रमनदीप सिंग ‘आऊट आॅफ फॉर्म’ असल्याचे दिसून आले.
आकाशदीप व निकिन थिमैया यांनी चांगली कामगिरी केली, पण रमनदीपने अनेक संधी गमावल्या. युवा स्ट्रायकर मनदीप सिंग कोरियाविरुद्धच्या लढतीत दुखापग्रस्त झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला सहभागी होता आले नाही. तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. भारताला पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घेणे आवश्यक आहे. व्ही.आर. रघुनाथ व रुपिंदर पाल सिंग यांच्यासारख्या दोन विश्वदर्जाच्या ड्रॅग फ्लिकरचा समावेश असल्यामुळे पेनल्टी कॉर्नर भारताची मजबूत बाजू आहे.
भारतीय संघाला सकारात्मक निकालासाठी मैदानावर चुका टाळणे आवश्यक असल्याचे मत प्रशिक्षक वान यांनी व्यक्त केले आहे. वान म्हणाले,‘आमच्या खेळामध्ये काही चूक नव्हती. चांगल्या खेळानंतरही आम्ही अपयशी ठरलो. आगामी कालावधीत मैदानावर चुका टाळणे आवश्यक आहे.’
दुसऱ्या बाजूला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या संघर्षपूर्ण खेळामुळे मलेशियन संघाने लक्ष वेधले होते. (वृत्तसंस्था)