भारताचे वर्चस्व

By admin | Published: September 1, 2015 12:16 AM2015-09-01T00:16:56+5:302015-09-01T00:16:56+5:30

तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने दुसऱ्या डावात सोमवारी चौथ्या

India's domination | भारताचे वर्चस्व

भारताचे वर्चस्व

Next

कोलंबो : तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने दुसऱ्या डावात सोमवारी चौथ्या दिवसअखेर ३ बाद ६७ अशी अवस्था करून २२ वर्षांनंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. पहिल्या डावात १११ धावांची आघाडी मिळविणाऱ्या भारताचा दुसरा डाव २७४ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला लक्ष्य गाठण्यासाठी अद्याप ३१९ धावांची गरज असून, त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. भारतापुढे मालिका विजय साकारण्यासाठी अखेरच्या दिवशी ७ विकेट घेण्याचे लक्ष्य आहे. भारताने यापूर्वी श्रीलंकेत १९९३मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. सध्या सुरू असलेल्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहेत.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीला पुन्हा एकदा धक्का दिला. उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याचा भारतीय गोलंदाजांना लाभ मिळाला. श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज उपुल थरंगा (०), दिमुथ करुणारत्ने (०) आणि दिनेश चांदीमल (१८) माघारी परतले आहेत. आजचा खेळ थांबविण्यात आला त्या वेळी सलामीवीर कौशल सिल्वा (२४) याला कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (२२) साथ देत होता. ईशांत शर्माने आतापर्यंत १४ धावांच्या मोबदल्यात २,तर उमेश यादवने ३२ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला आहे. ईशांतने पहिल्याच षटकात थरंगाला तंबूचा मार्ग दाखविला, तर त्यानंतर यादवने करुणारत्नेला यष्टिरक्षक ओझाकडे झेल देण्यास भाग पाडले. श्रीलंकेची दुसऱ्या डावात २ बाद २ अशी अवस्था झाली होती.
ईशांतने चांदीमलला माघारी परतवून श्रीलंकेची ३ बाद २१ अशी स्थिती केली. त्यानंतर सिल्वा आणि मॅथ्यूज यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. भारतीय गोलंदाज मंगळवारी सकाळच्या सत्रात झटपट बळी घेण्यासाठी प्रयत्नशील असतील; पण त्यासाठी वातावरण चांगले राहील, अशी प्रार्थना करावी लागेल. हवामान खात्याने मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्याआधी, आज सकाळी ३ बाद २१ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने दमदार मजल मारली. रोहित व कोहली यांनी सकाळच्या सत्रात दडपण न बाळगता फलंदाजी करताना चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. नुवान प्रदीपने कोहलीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने सुरुवातीपासून आक्रमक
पवित्रा स्वीकारला. रोहितने त्याच्यासोबत ५० धावांची भागीदारी केली. वैयक्तिक अर्धशतक झळकावल्यानंतर उपाहारापूर्वी रोहित आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी भारताची ५ बाद १३२ अशी स्थिती होती. त्यानंतर बिन्नी व ओझा यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची, तर मिश्रा व आश्विन यांनी आठव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बिन्नी वैयक्तिक २५ धावांवर असताना हेराथच्या गोलंदाजीवर परेराने यष्टिचित करण्याची संधी गमावली. बिन्नी ४९ धावा काढून बाद झाला. मिश्राला बदली क्षेत्ररक्षक मुबारकने जीवदान दिले.
ओझा आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेराथचा बळी ठरला. मिश्रा धावबाद झाला. आश्विनने आक्रमक फलंदाजी करताना कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आश्विनला प्रसादने माघारी परतवत भारताचा दुसरा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)

धावफलक
भारत पहिला डाव ३१२.
श्रीलंका पहिला डाव २०१. भारत दुसरा डाव : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ०, लोकेश राहुल त्रि. गो. प्रदीप २, अजिंक्य रहाणे पायचित गो. प्रदीप ४, विराट कोहली झे. थरंगा गो. प्रदीप २१, रोहित शर्मा झे. प्रदीप गो. प्रसाद ५०, स्टुअर्ट बिन्नी झे. थरंगा गो. प्रसाद ४९, नमन ओझा झे. करुणारत्ने गो. हेराथ ३५, अमित मिश्रा धावबाद ३९, रविचंद्रन आश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५८, उमेश यादव झे. हेराथ गो. प्रदीप ४, ईशांत शर्मा नाबाद २. अवांतर : १०. एकूण ७६ षटकांत सर्व बाद २७४. बाद क्रम : १-०, २-२, ३-७, ४-६४, ५-११८, ६-१६०, ७-१७९, ८-२३४, ९-२६९. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १९-३-६९-४, नुवान प्रदीप १७-२-६२-४, रंगाना हेराथ २२-०-८९-१, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज ६-३-११-०, तारिंदू कौशल १२-२-४१-०.
श्रीलंका दुसरा डाव
उपुल थरंगा झे. ओझा गो. ईशांत ०, कौशल सिल्वा खेळत आहे २४, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. उमेश ०, दिनेश चांदीमल झे. कोहली गो. ईशांत १८, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे २२. अवांतर : ३. एकूण १८.१ षटकांत ३ बाद ६७. बाद क्रम : १-१, २-२, ३-२१.
गोलंदाजी : ईशांत ७-२-१४-२, यादव ५-१-३२-१, बिन्नी ४-१-१३-०, मिश्रा २-०-२-०, आश्विन ०.१-०-४-०.

Web Title: India's domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.