भारताचा डबल धमाका
By admin | Published: January 28, 2016 01:50 AM2016-01-28T01:50:17+5:302016-01-28T01:50:17+5:30
भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने प्रजासत्ताकदिनी आॅस्ट्रेलियावर अविस्मरणीय विजय नोंदवीत जल्लोष केला. पुरुष संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली, तर महिला
अॅडिलेड : भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने प्रजासत्ताकदिनी आॅस्ट्रेलियावर अविस्मरणीय विजय नोंदवीत जल्लोष केला. पुरुष संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली, तर महिला संघाच्या विजयाची शिल्पकार हरमन कौर ठरली. धोनीच्या नेतृत्वात १८८ धावा उभारणाऱ्या टीम इंडियाने आॅस्ट्रेलियाला १५१ धावांवर रोखले. मिताली राजच्या नेतृत्वात महिला संघाने १४१ धावांचे विजयी लक्ष्य पाच गडी शिल्लक राखून सहज गाठले. दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडीवर आहेत.
कोहलीच्या ५५ चेंडूंत ९ चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९० धावांमुळे भारताने आॅस्ट्रेलियावर ३८ धावांनी विजय साजरा केला. कोहलीशिवाय सुरेश रैना याने ४१ धावांचे योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या १३४ धावांच्या भागीदारीमुळे भारताने आॅस्ट्रेलियात सर्वोच्च १८८ धावा उभारल्या. सुरेश रैनाने ४७ व्या टी-२० सामन्यांत १००० धावा पूर्ण केल्या. याआधी भारताने आॅस्ट्रेलियात ६ बाद १४० या सर्वोच्च धावा फेब्रुवारी २०१२ मध्ये सिडनीत नोंदविल्या होत्या. आॅस्ट्रेलियात पदार्पण करणारे दोन युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने २३ धावांत तीन आणि हार्दिक पंड्या याने ३७ धावांत दोन गडी बाद करुन यजमानांना जबरदस्त धक्के दिले. तसेच अनुभवी रवींद्र जडेजाने २१ धावांत दोन बळी घेतले.
रविचंद्रन आश्विन यानेदेखील
२८ धावा देत दोन गडी बाद केल्याने आॅस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत
१५१ धावांत संपुष्टात आला. कर्णधार अॅरोन फिंच याने सर्वाधिक ४४
धावा केल्या. अॅडिलेड ओव्हलमध्ये यजमान संघाचा हा सलग तिसरा पराभव होता. दुसरा सामना मेलबोर्नमध्ये २९ जानेवारीला खेळला जाईल. यजमानांना अखेरच्या पाच षटकांत ६५ धावांची गरज होती, पण त्यांचे चारही गडी २७ धावांत बाद झाले. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत : रोहित झे. फॉल्कनर गो. वॉटसन ३१, धवन झे. वेड गो. वॉटसन ५, कोहली नाबाद ९०, रैना त्रि. गो. फॉल्कनर ४१, धोनी नाबाद ११, अवांतर : १०, एकूण : २० षटकांत ३ बाद १८८ धावा. गोलंदाजी : टैट ४-०-४५-०, रिचर्डसन ४-०-४१-०, फॉल्कनर ४-०-४३-१, वॉटसन ४-०-२४-२, बायस ३-०-२३-०, हेड १-०-९-०.
आॅस्ट्रेलिया : फिंच पायचित गो. अश्विन ४४, वॉर्नर झे. कोहली गो. बुमराह १७, स्मिथ झे. कोहली गो. जडेजा २१, हेड पायचित गो. जडेजा २, लिन झे. युवराज गो. पंड्या १७, वॉटसन झे. नेहरा गो. अश्विन १२, वेड झे. जडेजा गो. पंड्या ५, फॉल्कनर त्रि. गो. बुमराह १०, रिचर्डसन त्रि. गो. नेहरा ९, बायस झे. पंड्या गो. बुमराह ३, टैट नाबाद १, अवांतर १०, एकूण : १९.३ षटकांत सर्व बाद १५१ धावा. गोलंदाजी : नेहरा ४-०-३०-१, आश्विन ४-०-२८-२, बुमराह ३.३-०-२३-३, जडेजा ४-०-२१-२, पंड्या ३-०-३७-२, युवराज १-०-१०-०.
हरमनप्रीतची चमक
अॅडलेड येथेच झालेल्या महिलांच्या टी२० सामन्यातही भारताने यजमानांचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. यामुळे एकाच दिवशी आॅसीला भारताकडून दोन पराभव स्वीकारावे लागले.
हरमनप्रीत कौरने केलेल्या ४६ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने आॅस्टे्रलियाचे १४१ धावांचे आव्हान ८ चेंडू व ५ गडी राखून सहज परतावले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार मिताली राजचा विश्वास सार्थ ठरवताना गोलंदाजांनी यजमानांना ५ बाद १४० धावांवर रोखले. सलामीवीर बेथ मुने (३६), अॅलेक्स ब्लॅकवेल (नाबाद २७) आणि शेवटला अलीसा हिले हिने केवळ १५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा कुटताना संघाला सामाधनकारक मजल मारुन दिली. पूनम यादवने २ तर झुला गोस्वामी, शिखा पांड्ये व अनुजा पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.
च्भारताला सुरुवातीलाच मिताली राजच्या (४) रुपाने मोठा धक्का बसला. यानंतर मात्र स्मृती मंधना (२९), वेदा कृष्णमुर्ती (३५) व हरमनप्रीत (४६) यांनी दमदार फलंदाजी केली. हरमनप्रीतने ३१ चेंडूत ६ चौकार व एक षटकार खेचला. अखेरच्या क्षणी महाराष्ट्राच्या अनुजा पाटील (१४) व शिखा पांड्ये (४) यांनी नाबाद राहत भारताचा विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
आॅस्टे्रलिया : २० षटकांत ५ / १४० धावा (अलिसा हेली नाबाद ४१, बेथ मुने ३६; पूनम यादव २/२६)
भारत : १८.४ षटकांत ५ / १४१ धावा (हरमनप्रीत कौर ४६, वेदा कृष्णमूर्ती ३५; जेस जॉनसेन २/२४, मेगन स्कट्ट २/२३).
तिरंगा फडकावणारा कोहलीचा
चाहता पाकमध्ये अटकेत
लाहोर : विराट कोहलीच्या एका पाकिस्तानी चाहत्याला भारताच्या विजयाचा जल्लोष करतेवेळी घरावर चक्क तिरंगा फडकविणे महागात पडले. त्याला लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली. इमर दराज याने छतावर भारतीय ध्वज फडकविल्याची तक्रार मिळताच पोलीसांनी उमरला अटक केली. एका पोलीसाने दिलेल्या माहितीनुसार तक्रार येताच उमरच्या घरी धाड टाकून तिरंगा ताब्यात घेतला. कायदा व सुव्यवस्थेत अडथळा आणल्याप्रकरणी उमरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.