भारताचा सहज विजय
By admin | Published: March 4, 2016 02:55 AM2016-03-04T02:55:36+5:302016-03-04T02:55:36+5:30
सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत युएई संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.
मीरपूर : सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या (८ धावांत २ बळी)
अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.
युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण अंतिम फेरी यापूर्वीच निश्चित करणाऱ्या भारतीय संघाने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीयांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव ९ बाद ८१ धावा असा मर्यादित राहिला.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (२८ चेंडूत ३९) आणि युवराज सिंग (१४ चेंडूत नाबाद २५) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १०.१ षटकांत बाजी मारली. रोहित शर्मा अतिआक्रमणाच्या नादात बद झाल्यानंतर युवराजने शिखर धवनसह (नाबाद १६) संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी, भुवनेश्वरच्या अचूक गोलंदाजीला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, युवराज सिंग व पवन नेगी यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. यूएईच्या शैमन अन्वरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी करताना एकाकी झुंज दिली. (वृत्तसंस्था)