भारताचा रोमांचक विजय
By admin | Published: February 19, 2016 02:54 AM2016-02-19T02:54:48+5:302016-02-19T02:54:48+5:30
वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आपले विजयी अभियान पुढे सुरू ठेवताना
हैदराबाद : वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आपले विजयी अभियान पुढे सुरू ठेवताना
आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बलाढ्य चीनला ३-२ असे हरवून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ग्रुप एमध्ये यापूर्वीच आपले स्थान निश्चित केलेल्या भारताने चीनला हरवून
गटात अव्वल स्थान मिळविले आहे. भारताने बुधवारी आपल्या पहिल्या सामन्यात सिंगापूरला ५-०ने हरवले होते.
श्रीकांतने स्पर्धेत पहिला एकेरी सामना जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने होवेइतियानला ३३ मिनिटांत २१-११, २१-१७ असे हरवले. अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी अन्य दोन एकेरी सामने जिंकले. जयरामने दुसऱ्या एकेरी सामन्यात झेंगमिंग वांग याला एक तास तीन मिनिटांच्या संघर्षमय सामन्यात २२-२०, १५-२१, २१-१८ असे हरवले.
दुहेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांच्या जोडीला जुनहुइली आणि जिहान कियू या जोडीने ३२ मिनिटांत २२-२०, २१-११ असे हरवले. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात यिल्व वांग आणि वेन झांग यांनी प्रणव चोपडा आणि अक्षय देवाळकर यांना ३३ मिनिटांत २१-१०, २१-१८ असे सहज हरवले. शेवटच्या निर्णायक एकेरीच्या सामन्यात एच. एस. प्रणयने भारताला विजय मिळवून देताना यू की शी याला २१-१०, २१-१८ असे हरवले. (वृत्तसंस्था)