युरोपियन देशाविरुद्ध भारताचा पहिला विजय; महिला फुटबॉल, एस्टोनियाला ४-३ असे नमवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:20 AM2024-02-22T09:20:55+5:302024-02-22T09:21:07+5:30
चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारताकडून दोन गोल करत मनीषा कल्याणने शानदार कामगिरी केली. मध्यंतराला दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती.
अलान्या (तुर्की) : भारताच्या महिला फुटबॉल संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बुधवारी तुर्की चषक फुटबॉल स्पर्धेत एस्टोनियाचा अटीतटीच्या सामन्यात ४-३ असा पराभव केला. यासह भारतीय महिलांनी पहिल्यांदाच युरोपियन देशाविरुद्ध सामना जिंकण्याची कामगिरी केली. भारतीय वरिष्ठ महिला संघाने याआधी कधीही यूएफा महासंघाच्या अंतर्गत येणाऱ्या संघाविरुद्ध विजय मिळवला नव्हता.
चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारताकडून दोन गोल करत मनीषा कल्याणने शानदार कामगिरी केली. मध्यंतराला दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती.
मनीषाने १७व्या आणि ८१व्या मिनिटाला गोल केले. इंदुमती काथिरेसन (६२वे मिनिट) आणि प्यारी खाका (७९वे मिनिट) यांनीही प्रत्येकी एक गोल करत मनीषाला चांगली साथ दिली.
एस्टोनियाकडून लिसेटे तामिक (३२वे मिनिट), व्लाडा कुबासोवा (८८वे मिनिट) आणि मारी लिस लिलेमाए (९०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
बचावाच्या जोरावर मिळवला विजय
एस्टोनियाने बरोबरी साधल्यानंतर भारताने इंदुमती, खाका आणि मनीषा यांच्या जोरावर ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती.
परंतु, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारतीय बचावपटूंकडून झालेल्या काही चुकांमुळे व्लाडा आणि मारी यांनी गोल करत एस्टोनियाच्या पराभवाचे अंतर कमी केले. मात्र, नंतर भारताने भक्कम बचावाच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय निश्चित केला.