भारताचे लक्ष्य मालिका विजय

By admin | Published: November 25, 2015 12:03 AM2015-11-25T00:03:48+5:302015-11-25T04:28:55+5:30

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असलेला युवा भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १-० ने अघाडीवर असून यजमान संघ बुधवारपासून प्रारंभ

India's goal series victory | भारताचे लक्ष्य मालिका विजय

भारताचे लक्ष्य मालिका विजय

Next

नागपूर : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असलेला युवा भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १-० ने अघाडीवर असून यजमान संघ बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर बंगलोर येथे दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत संपला.
बंगलोरमध्ये पहिल्या दिवसानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही तर मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तीन दिवसांत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या कसोटी मालिकेत तीन डावांमध्ये १८४, १०९ आणि २१४ धावा केलेल्या आहेत. ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या दक्षिण आफ्रिका संघापुढे भारतीय फिरकीचे आव्हान राहणार आहे. चौथा व अखेरचा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे.
मोहालीमध्ये सलामीवीर मुरली विजय व तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारा यांचा अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण कमी धावसंख्येच्या या लढतीत गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सरशी साधली. बेंगळुरूमध्ये शिखर धवनने सूर गवसल्याचे संकेत दिले असून भारतीय संघासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. त्याने नाबाद ४५ धावांची खेळी केली होती. मोहालीमध्ये विजयने ७५ व ४७ धावा फटकावल्या होत्या. विजयच्या मते फलंदाजी भारतीय संघासाठी चिंतेची बाब नाही.
भारतीय फिरकीची बाजू फॉर्मात असलेला अश्विन व जडेजा सांभाळतील. दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाबाहेर असलेला अमित मिश्रा पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ तीन स्पेशालिस्ट फिरकीपटूंसह खेळणार असल्याचे संकेत कर्णधार कोहलीने दिले आहेत.
भारतीय संघाची भिस्त फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, कर्णधार कोहली, मुरली विजय व शिखर धवन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
दक्षिण आफ्रिकेतर्फे डिव्हिलियर्सचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मोहाली कसोटीत डिव्हिलियर्सला मिश्राने दोन्ही डावात बाद केले होते. कर्णधार हाशिम अमला व फॅफ ड्यू प्लेसिस यांना मोठी खेळी करता आली नाही तर २००६ नंतर विदेशात कसोटी मालिका न गमावण्याचा दक्षिण आफ्रिकेचा विक्रम धोक्यात येण्याची शक्यता आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
अमलाने पाच वर्षांपूर्वी या मैदानावर २५३ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिका संघाला कर्णधाराकडून मोठ्या खेळीची आशा आहे. वेगवान गोलंदाज स्टेन दुखापतग्रस्त असून त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने येथे विजय मिळवला होता. त्यावेळी स्टेनने १० बळी घेतले होते. स्टेनने सरावादरम्यान काही वेळ गोलंदाजी केली, पण त्याच्या खेळण्याबाबत साशंकता असल्याचे कर्णधार आमलाने स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)
- सामन्याची वेळ : स. ९.३० पासून
- पीच रिपोर्ट..
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमची खेळपट्टी कोरडी भासत असल्यामुळे फिरकीपटूंना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या कसोटीत फिरकी गोलंदाजींच्या बळावर यजमान संघ वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीत खेळलेल्या भारतीय संघात स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी अमित मिश्राला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
- द. आफ्रिकेचा विक्रम धोक्यात
नागपूरमध्ये बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिका संघावर केवळ मालिका गमाविण्याचेच दडपण नसून विदेशात गेल्या नऊ वर्षांत मालिका न गमावण्याचा त्यांचा विक्रम धोक्यात आला आहे.
भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला नागपूरमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर त्यांना मालिका गमवावी लागेल. हा पराभव केवळ मालिका गमावण्यासाठी कारणीभूत ठरणार नसून विदेशात गेल्या ९ वर्षांत १० कसोटी मालिका जिंकण्याची त्यांची परंपरा खंडित होणार आहे.
जामठा स्टेडियममध्ये बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल संघ असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने २००६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ०-२ ने पराभव स्वीकारल्यानंतर विदेशात मालिका गमावलेली नाही. दक्षिण आफ्रिका संघाने २००६ नंतर वर्ष २००८-०९ व २०१२-१३ या कालावधीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा कसोटी मालिका जिंकल्या. या व्यतिरिक्त त्यांनी २००८ मध्ये इंग्लंड, २०१० मध्ये वेस्ट इंडिज, २०११-१२ मध्ये न्यूझीलंड, २००८-०९ मध्ये पाकिस्तान, २०१४ मध्ये श्रीलंका, २००७-०८ मध्ये बांगलादेश आणि २००७-०८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्याची कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिका संघाने भारतात २००७-०८ मध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने आणि २००९-१० मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने अनिर्णीत संपल्या. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला १९९६-९७ मध्ये भारतात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ ने आणि २००४-०५ मध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतात दक्षिण अफ्रिका संघ प्रथमच चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यांनी पाच दौऱ्यांमध्ये केवळ एकदा १९९९ मध्ये कसोटी मालिका जिंंकलेली आहे. जर नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिका संघाला पराभव स्वीकारावा लागला तर भारतात त्यांना तिसऱ्यांदा कसोटी मालिका गमवावी लागेल आणि त्यांचा कसोटी सामन्यातील सहावा पराभव ठरेल.

Web Title: India's goal series victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.