भारताचे लक्ष्य मालिका विजय

By Admin | Published: February 1, 2017 05:03 AM2017-02-01T05:03:57+5:302017-02-01T05:03:57+5:30

पहिली लढत गमावल्यानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतलेला यजमान भारतीय संघ बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व निर्णायक टी-२० लढतीत इंग्लंडचा पराभव करीत

India's goal series victory | भारताचे लक्ष्य मालिका विजय

भारताचे लक्ष्य मालिका विजय

googlenewsNext

बंगळुरू : पहिली लढत गमावल्यानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतलेला यजमान भारतीय संघ बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व निर्णायक टी-२० लढतीत इंग्लंडचा पराभव करीत मालिकेत सरशी साधण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-० ने, तर वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर विराट कोहलीची नजर आता टी-२० सामन्यांची मालिका जिंकण्यावर केंद्रित झाली आहे. गेल्या लढतीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन नाराज होता. मालिका विजयासह भारत दौऱ्याचा समारोप करण्यास मॉर्गन प्रयत्नशील आहे. जसप्रीत बुमराहने १८ व्या व २० व्या षटकात केवळ पाच धावा बहाल केल्या. ज्यो रुटला मोक्याच्या क्षणी पायचित बाद ठरविण्याचा पंच शमसुद्दीन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळले गेले. रिप्लेमध्ये चेंडू रुटच्या बॅटला लागून गेल्याचे स्पष्ट दिसत होते. इंग्लंड संघ गेल्या लढतीत केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास प्रयत्नशील आहे.
पहिली लढत गमाविल्यानंतर दुसऱ्या लढतीत पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतात क्रिकेटच्या सर्वच प्रकारात अद्याप एकही मालिका न गमावणारा कर्णधार कोहली आपल्या कामगिरीमध्ये आणखी एका नव्या विक्रमाची भर घालण्यास उत्सुक आहे. भारताने गेल्या वर्षी या मैदानावर टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशचा एका धावेने पराभव केला होता.
बांगलादेशविरुद्ध मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या लढतीत आणि रविवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात बुमराहने चांगली गोलंदाजी केली.
नागपूरमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डन, बेन स्टोक्स व टी मिल्स यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांना चपळ क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली.
कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी या तीन वेगवान गोलंदाजांना रोखण्याची योजना तयार केली असेल. भारतातर्फे दिग्गज फलंदाज कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना चमकदार फलंदाजी करण्यास प्रयत्नशील आहेत. खडतर खेळपट्टीवर ७१ धावांची खेळी केल्यामुळे के. एल. राहुलचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली असेल. कोहलीकडे संघात बदल करण्यासाठी काही पर्याय आहेत, पण युवा ऋषभ पंतला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देणे जुगार ठरेल. पंतने इंग्लंडविरुद्ध मुंबईमध्ये ५० षटकांच्या सराव सामन्यात आक्रमक फलंदाजी केली होती. भुवनेश्वर कुमारही गेल्या दोन लढतींमध्ये संघाबाहेर होता. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर त्याला संधी मिळू शकते.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने अलीकडेच या मैदानावर ४.५ कोटी रुपयांचा खर्च करताना अत्याधुनिक ड्रेनेजव्यवस्था सुरू केलेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मैदानावरील पाण्याचा ३६ पटीने वेगाने निचरा होतो व मैदान लवकर खेळण्यायोग्य होते. ब्रिटनच्या वेम्बले, न्यूयॉर्क मेट््स, सीटल मरिनर्स, कॅनडाचे बीएमओ फिल्ड, मॅन्चेस्टर सिटीचे एतिहाद स्टेडियम यामध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, सुरेश रैना, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, परवेझ रसूल, आशिष नेहरा, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मनदीप सिंग, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.
इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, ज्यो रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, टी. मिल्स, जोनाथन बेअरस्टो, जॅक बॉल, लियाम डॉसन, डेव्हिड विली.

सामन्याची वेळ :
सायंकाळी ७ पासून.

स्थळ :
चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

Web Title: India's goal series victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.