सिंहासन बळकट करण्याचे भारताचे लक्ष्य
By admin | Published: November 9, 2016 02:19 AM2016-11-09T02:19:53+5:302016-11-09T02:19:53+5:30
वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आजपासून
राजकोट : वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आजपासून (बुधवार) प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होत आहे. ही मालिका कमीत कमी अनिर्णित राखल्यास भारत या वर्षाखेरीपर्यंत नंबर वनच राहील, त्यामुळे आपले सिंहासन बळकट करण्याचे भारताचे या मालिकेत लक्ष्य असेल. तीन दशकांच्या कालावधीत भारतात प्रथमच पाच कसोटी सामन्यांची मालिका होत असून, पहिल्या कसोटी सामन्यासह कसोटी केंद्र म्हणून राजकोट येथे पदार्पण करणार आहे. त्यामुळे ही मालिका एकाअर्थाने ऐतिहासिक आणि चुरशीची होणार आहे.
चार वर्षापूर्वी, म्हणजे २०१२ मध्ये इंग्लंडने पहिला कसोटी सामना गमाविल्यानंतर दमदार पुनरागमन करीत चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली होती. त्या वेळी इंग्लंडच्या विजयात ग्रॅमी स्वान व मॉन्टी पनेसर या फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरली होती, पण या वेळी त्यांचा संघात समावेश नाही. विद्यमान कर्णधार अॅलिस्टर कुक व वादग्रस्त फलंदाज केव्हिन पीटरसनने त्या वेळी चमकदार फलंदाजी केली होती. पीटरसनही आता इंग्लंड संघात नाही. भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने चार वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला या दोन्ही मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
इंग्लंड संघ या वेळी बांगलदेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत राखल्यानंतर येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात इंग्लंडला प्रथमच यजमान संघाविरुद्ध कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या व्यतिरिक्त जवळजवळ आठवडाभरापूर्वी येथे दाखल झालेल्या इंग्लंड संघाने एकही सराव सामना खेळलेला नाही. इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अॅन्डरसन खांद्याच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. तो पहिला कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे निश्चित आहे.
कुक आणि कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणार असलेला अष्टपैलू स्टुअर्ट ब्रॉड आक्रमक नेतृत्व करणाऱ्या कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध दुय्यम संघ म्हणून सुरुवात करणार आहे. कोहली इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.
भारतीय संघ मात्र इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करणार नाही. प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मात्र ज्याप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने विजय मिळवला त्याचप्रमाणे संघाने या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखावे, असे वाटते. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सोमवारी इंग्लंडविरुद्ध आत्ममश्गूल राहू नये, असा संघसहकाऱ्यांना सल्ला दिला आहे. भारतात प्रथमच कसोटी मालिकेत डीआरएसचा वापर होणार आहे.
कोलकातामध्ये २०१२ ला इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ मायदेशात १४ कसोटी सामन्यांत अपराजित आहे. लोकेश राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा दुखापतग्रस्त असले, तरी भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. फलंदाजीमध्ये भारतीय संघाची भिस्त पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीवर राहणार आहे. मुरली विजय आणि पुनरागमन करणारा गौतम गंभीर व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या चेतेश्वर पुजारा यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. पुजाराचे हे गृहमैदान आहे. सर्वांची नजर मात्र या लढतीसाठी सज्ज असलेल्या सौरष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील खेळपट्टीवर राहणार आहे. एससीएचे सचिव निरंजन शाह यांच्या मते खेळपट्टीकडून चौथ्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल.
फॉर्मात असलेला रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत फिरकी गोलंदाजीमध्ये भारताचे पारडे वरचढ आहे. भारतीय संघ या लढतीत तीन फिरकीपटूंना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेग स्पिनर अमित मिश्राला संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)
कुकने केली आश्विनची प्रशंसा
इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने भारतीय फिरकीपटू रविचंद्रन आश्विनची प्रशंसा करताना तो जागतिक दर्जाचा गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. कुकने आश्विनची तुलना त्याचा माजी सहकारी ग्रॅमी स्वानसोबत केली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पूर्वसंध्येला बोलताना ‘भारतीय परिस्थितीत आश्विनने गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीत घेतलेल्या बळींची संख्या बघितल्यानंतर त्याच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. २०१२ च्या तुलनेत आश्विनकडे आता अधिक अनुभव आहे,’ असे कुक म्हणाला.
डीआरएस म्हणजे रॉकेट सायन्स नाही
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत डीआरएसचा अवलंब करण्यात येणार असल्यामुळे भारतीय संघाची झोप उडालेली नाही. डीआरएस म्हणजे काही ‘रॉकेट सायन्स’ नाही, असे मत विराटने व्यक्त केले. विराट म्हणाला, ‘डीआरएस काही रॉकेट सायन्स नाही. चेंडू कुठे आदळला, चेंडूचा टप्पा अचूक होता का, याची माहिती असणे आवश्यक असते. डीआरएससाठी काही वेगळा कोर्स करण्याची गरज नाही. डीआरएसचा वापर कसा करायचा, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.’
...तर भारताचे अव्वल स्थान कायम राहील
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका केवळ अनिर्णित राखली, तरी भारताचे अव्वल स्थान या वर्षअखेरीपर्यंत कायम राहणार आहे.
सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो आहे. त्यापाठोपाठ आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. या चौघांत जास्तीत जास्त दहा गुणांचे अंतर आहे. विशेष म्हणजे, हे चारही संघ सध्या विविध देशांसोबत कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.
भारताने ही मालिका ड्रॉ केली, तरी भारताचे ११५ वरुन ११३ गुण झाले तरी अव्वल स्थान कायम राहील, मग पाकिस्तान-न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका मालिकेचा निकाल काहीही लागो. भारताने ही मालिका ३-२ अशी जिंकली, तर त्यांचे ११६ गुण होतील, ४-१ असा विजय मिळवला तर गुणसंख्या ११९ वर जाईल आणि व्हाईटवॉश दिला तर भारताचे १२२ गुण होतील.
प्रतिस्पर्धी
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पंड्या, करुण नायर आणि जयंत यादव.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल,
गॅरी बॅलेन्स, गॅरेथ बॅटी, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, बेन डकेट, स्टिव्हन फिन, हसीब हमिद, मोईन अली, जफर अन्सारी, आदिल राशिद, जो रुट, बेन स्टोक्स आणि ख्रिस व्होक्स.
सामना
भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून.