तिरंदाजी विश्वचषकात भारताला सुवर्णपदक
By admin | Published: May 21, 2017 01:25 AM2017-05-21T01:25:53+5:302017-05-21T01:25:53+5:30
येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण
शांघाय : येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण करणारा अमनजितसिंग यांच्या या त्रिकुटाने जबरदस्त कामगिरीच्या बळावर दहाव्या रँकिंगवरील कोलंबियाचा अंतिम सामन्यात पराभव केला. चुरशीच्या लढतीत भारताने कोलंबियाला २२६-२२१ अशा गुणफरकाने धूळ चारली.
सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बहारदार कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि अमनजितसिंग यांनी अखेरच्या क्षणी निर्णायक गुण नोंदविले. भारताने पहिला सेट ५८-५७ असा जिंकला. नंतर तिन्ही सेटमध्येदेखील बाजी मारली. दरम्यान, तिसरा सेट कोलंबियाच्या खेळाडूंनी ५२-५२ असा ‘टाय’ केला. पराभूत कोलंबिया संघात कामिलो आंद्रेस कार्डोना, जोस कार्लोस ओस्पिना आणि डॅनियल मुनोज यांचा समावेश होता.
त्याआधी भारताने व्हिएतनाम, इराण आणि अमेरिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्माने प्रथमच सांघिक सुवर्ण जिंकले. विश्वचषकात त्याचे हे दुसरे सुवर्ण ठरले. तो म्हणाला, ‘येथे दाखल होण्याआधी आम्ही बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. आठवडाभर सरावादरम्यान गुण वाढविण्यावर भर देत होतो.’ २०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले होते.
दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिल्लीचा २७ वर्षांचा अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीचा कोरियाने १५३-१५१ अशा गुणफरकाने पराभव केला होता. आता कांस्यपदकासाठी ही जोडी अमेरिकेशी भिडणार आहे.
दरम्यान, रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अतानु आणि दीपिका कुमारी यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली. उपांत्यपूर्व फेरीत अतानुचा नेदरलँडच्या स्टीव्ह विलेयरने पराभव केला. दीपिकालाही पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)