भारताची सुवर्ण लयलूट
By admin | Published: February 10, 2016 03:44 AM2016-02-10T03:44:49+5:302016-02-10T03:44:49+5:30
भारतीय खेळाडूंनी जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, भारोत्तोलन, सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदकांची लयलूट करून १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी
द. आशियाई क्रीडा स्पर्धा : ११९ पदकांसह आघाडीवर
गुवाहाटी : भारतीय खेळाडूंनी जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, भारोत्तोलन, सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदकांची लयलूट करून १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी आपला दबदबा कायम राखला. भारत आजपर्यंत एकूण ७६ सुवर्ण, ३६ रौप्य व १० कांस्य (एकूण १२२) जिंकून प्रथम क्रमांकावर आहे. श्रीलंका संघ १७ सुवर्ण, ३६ रौप्य व ३१ कांस्य पदके (एकूण ८४) जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. मैदानी स्पर्धेत आज भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रद्धा घुलेला लांब उडीत तृतीय तर ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वाती गाढवेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
नेमबाजी स्पर्धा आजपासून
भारताला १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेत जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळण्याची आशा अहे. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारे ६ नेमबाज या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताच्या २९ सदस्यांच्या संघात आॅलिम्पिक पदकविजेता गगन नारंग व विजय कुमार यांचा समावेश आहे. नेमबाजीमध्ये १३ सुवर्णपदकांचा निकाल लागणार असून, त्यातील जास्तीत जास्त सुवर्णपदके भारताच्या वाट्याला येतील, अशी आशा आहे.
नारंगव्यतिरिक्त भारतीय संघात रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारे चैनसिंग, प्रकाश नांजप्पा, गुरप्रीतसिंग, अपूर्वी चंदेला आणि हिना सिद्धू यांचा समावेश आहे. चैन व गगन तिन्ही रायफल स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. बांगलादेशाने २०१०मध्ये झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती; पण गेल्या ६ वर्षांत त्यांच्या नेमबाजांना विशेष छाप पाडता आली नाही. त्यामुळे नेमबाजीमध्ये भारताला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता धूसर आहे.
भारताने २०१०मध्ये या स्पर्धेत महिला व पुरुष विभागात वर्चस्व गाजवले होते. त्या वेळी भारताने २२ पैकी १९ सुवर्ण व ८ रौप्य पदके पटकावली होती. बांगलादेशाने उर्वरित ३ सुवर्ण व ६ रौप्य पदके जिंकली होती. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सध्या युरोपमध्ये असलेला अभिनव बिंद्रा या स्पर्धेत सहभागी झालेला नाही.
भारोत्तोलन : भारताला १२ सुवर्ण
भारतीय भारोत्तोलकांनी मंगळवारी भारोत्तोलन स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी एका सुवर्ण व एका रौप्य पदकाची कमाई केली. भारताने या क्रीडाप्रकारात १२ सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. पुरुष विभागात भारताने आठपैकी सहा सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले, तर महिला विभागात सातपैकी सहा सुवर्णपदकांची कमाई केली.
सुशीला पवारने महिलांच्या ७५ किलोंपेक्षा अधिक वजन गटात एकूण १९८ किलो वजन पेलले आणि सुवर्णपदकाचा मान मिळविला. श्रीलंकेची ईशानी अनुष्का कालुथानत्रीने रौप्य, तर नेपाळची तारादेवी पुनने कांस्य पदक पटकावले. पुरुषांच्या १०५ पेक्षा अधिक किलो वजन गटात भारताच्या गुरदीपसिंगने ३४५ किलो वजन पेलताना दुसरे स्थान पटकावले.
सायकलिंग : यजमानांचे वर्चस्व
भारतीय सायकलपटूंनी मंगळवारी १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावताना मोहिमेचा शानदार शेवट केला. अन्य क्रीडाप्रकारांप्रमाणे भारतीय खेळाडूंनी या क्रीडाप्रकारातही वर्चस्व गाजवताना आठपैकी सहा सुवर्णपदके पटकावली. याव्यतिरिक्त पाच रौप्य व दोन कांस्य पदके भारताने पटकावली.
मंगळवारी भारतीय महिलांनी ८० किलोमीटर वैयक्तिक रोड रेसमध्ये सर्व पदके पटकावली. टी. विद्यालक्ष्मीने २ तास ३० मिनिटे आणि ५५.३५० सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. तिची मायदेशातील सहकारी लिडियामोल सन्नी (२.३०:५५.६९) व गीता राजू (२.३०:५५.९०) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
जलतरण : भारताला सात सुवर्ण
भारतीय जलतरणपटूंनी १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सात सुवर्णपदकांची कमाई केली. गेले तीन दिवस श्रीलंकेकडून यजमान देशाच्या जलतरणपटूंना कडवी टक्कर मिळत आहे. मंगळवारी मात्र भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. सौरव सांगवेकरने पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये ३ मिनिट ५८.८४ सेकंद वेळेसह नवा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये मालविकाने ४ मिनिट ३०.०८ सेकंद वेळेसह स्पर्धा विक्रम नोंदवता सुवर्णपदकाचा मान मिळवला. सजन प्रकाशने पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये २ मिनिटे ३-०२ सेकंद वेळेसह भारताला मंगळवारी तिसरे सुवर्णपदक पटकावून दिले. त्यानंतर दामिनी गौडाने महिलांच्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये २ मिनिटे २१-१२ सेकंद अशा विक्रमी वेळेसह तर पी. एस. मधूने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये २६.८६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या बॅकस्ट्रोकमध्ये श्रीलंकेच्या किमिको रहीमने सुवर्णपदकाचा मान मिळवला. भारताने याव्यतिरिक्त पुरुष व महिला विभागात ४ बाय २०० मीटर बटरफ्लाय जलतरणामध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला. सजन प्रकाश (४०० मीटर फ्रीस्टाइल पुरुष), शिवानी कटारिया (४०० मीटर फ्र्रीस्टाइल महिला), एम. अरविंद (५० मीटर बॅकस्ट्रोक पुरुष) व माणा पटेल (५५० मीटर बॅकस्ट्रोक महिला) यांनी रौप्य पटकावले.
अॅथलेटिक्स : पाच सुवर्ण
अॅथलेटिक्स (ट्रक अॅन्ड फिल्ड) : रियो आॅलिम्पिकसाठी पात्र झालेल्या मनप्रित कौरसह भारताच्या पाच खेळाडूंनी आज पाच सुवर्ण पदके जिंकली. यासह ६ रौप्य व ३ कांस्यपदकांची सुद्धा भारतीय खेळाडूंनी कमाई केली. मनप्रितने १७.९४ मीटर गोळा फेकून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. मनप्रित ज्युनिअरने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या हातोडा फेक प्रकारात निरजकुमारने ६६.१४ मीटर हातोडा फेकून सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या लांबउडीमध्ये भारताच्या मयुखा जॉनीने ६.४३ मिटर अंतर कापून सुवर्णपदक जिंकले. श्रद्धा घुलेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत एल. सूर्याने सुवर्ण तर स्वाती गाढवेने रौप्य जिंकले.
तिरंदाजी : १० सुवर्ण व ४ रौप्य
भारतीय तिरंदाजांनी १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह गटात सर्व पाच सुवर्ण व दोन रौप्य पदके पटकावताना क्लीन स्वीप केले.
सकाळच्या सत्रात पुरुष, महिला व मिश्र दुहेरीत संघाने सुवर्णपदक पटकावल्यानंतर रिकर्व्ह गटात दुपारच्या सत्रात भारतीय तिरंदाजांनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदके पटकावली. भारताने या स्पर्धेत १० सुवर्ण व चार रौप्य पदकांची कमाई केली. २०१४मध्ये आशियाई स्पर्धेनंतर पुनरागमन करणाऱ्या तरुणदीप रॉयने सॅग स्पर्धेत वैयक्तिक जेतेपद कायम राखले आणि दीपिका कुमारीच्या साथीने सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक केली. या दोघांनी मिश्र दुहेरीसह वैयक्तिक गटातही अव्वल स्थान पटकावले.
दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी मांझी व बोंबायलादेवी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने रिकर्व्ह इव्हेंटमध्ये श्रीलंकेचा ६-० ने पराभव करून मंगळवारी पहिले पदक पटकावले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणाली, ‘‘स्टेडियममध्ये वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे परफेक्ट १० नोंदवणे कठीण होते; पण लढत सोपी असल्याने दडपण आले नाही.’’
पुरुष संघाने श्रीलंकेचा ५-१ ने पराभव केला. या संघात तरुणदीप रॉय, गुरुचरण बेसरा आणि जयंत तालुकदार यांचा समावेश होता. रॉय व तालुकदार फॉर्मात नव्हते; पण बेसराने शानदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. रॉय व दीपिका यांनी मिश्र दुहेरीत संघाला सुवर्णपदक पटकावून दिले. त्यांनी बांगलादेशाच्या सोजेब शेख व ब्युटी रॉय यांचा ६-० ने पराभव केला. भारताच्या पुरुष व महिला खेळाडूंना वैयक्तिक गटात पदक निश्चित झाले आहे.