भारताची सुवर्ण झळाळी

By admin | Published: July 22, 2016 05:30 AM2016-07-22T05:30:24+5:302016-07-22T05:30:24+5:30

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे.

India's golden light | भारताची सुवर्ण झळाळी

भारताची सुवर्ण झळाळी

Next


आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे. २००८ साली ड्रॅगनच्या देशांत झालेल्या आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने चिनी खेळाडू झु चिआनला मागे टाकून इतिहास घडवत भारताला पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले. या एका सुवर्ण यशानंतर भारतातील नेमबाजी खेळाला वेगळेच वळण लागले. युवा खेळाडू मोठ्या संख्येने नेमबाजीकडे वळाल्याने भारतात या खेळाने चांगलाच जोर धरला.
नेमबाजीच्या इतिहासातले पहिले आणि मानाचे पान लिहिले ते राजवर्धनसिंह राठोड यांनी. त्यांनी २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले होते. डबल ट्रॅप प्रकारांत नेमबाजीत कर्नल राठोड यांचा दबदबा काही औरच होता. आपल्या कौशल्याचा प्रयत्य त्यांनी दाखवला आणि १९६० च्या पॅरिस स्पर्धेनंतर म्हणजेच तब्बल ४४ वर्षांनी भारताला आॅलिम्पिक रौप्यपदक मिळवून दिले. राठोड यांनी अंतिम फेरीत ५० पैकी ४४ गुण मिळवत इतिहास लिहिला. भारताने आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात २६ पदक मिळवली आहेत. त्यापैकी ४ पदक नेमबाजीने मिळवून दिली असून यामध्ये एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्यपदके आहेत.
२००८ साली अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्ण पटकावल्यानंतर २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी पदकाची कमाई केली. नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य, तर विजय कुमार याने २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदक पटकावले. गगनने २०१२ च्या लंडन स्पर्धेत ७०१.१ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले, तर रोमानियाच्या मॉल्डेवेन्यु एलिन जॉर्ज याने ७०२.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नव्हते. त्याचवेळी, सैन्यदलाचा खेळाडू असलेल्या विजयकुमार याने ६०० पैकी ५८५ गुणांची कमाई केली. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधत पदक पटकावले. तर, सुवर्ण विजेत्या क्युबाच्या खेळाडूने ३४ निशाणे साधले. राजवर्धनसिंह राठोड नंतर आॅलिम्पिक पदक पटकावणारा विजय कुमार हा सैन्यदलाचा दुसरा नेमबाज ठरला. आता, रिओ स्पर्धेत भारतीय संघ एकूण १२ पदके मिळवू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात नेमबाजांचाही मोठा वाटा असेल. भारतीय संघात पदकाच्या सर्वाधिक आशा ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्राकडून आहेत. तसेच. कांस्यपदक विजेता गगन नारंग, हिना सिद्धु, जितू राय यांच्याकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
- आकाश नेवे, जळगाव
>इतिहासाची पाने उलगडताना
1951 साली नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना, डॉ. जी.व्ही. मालवणकर पहिले अध्यक्ष
1952 हेलसिंकी
(फिनलॅण्ड) स्पर्धेत
डॉ. हरिहर बॅनर्जी यांनी रायफल
३ पोझिशनन आणि प्रोन पोझिशन प्रकारात सहभाग नोंदवून आॅलिम्पिकमधील पहिला भारतीय खेळाडू म्हणून नाव कोरले
1995
साली पहिल्यांदाच सायप्रसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सहभाग
भारतीय संघ : जितू राय, अपूर्वी चंदेला,
गगन नारंग, अभिनव बिंद्रा, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चैन सिंह, मिराज अहमद खान, हिना सिध्दू, कियान चेनई, अयोनिका पॉल, मानवजीतसिंग संधू.
१९५२ हेलसिंकी आॅलिम्पिक स्पर्धा
डॉ. हरिहर बॅनर्जी यांच्या रूपाने स्वतंत्र भारताचा पहिला नेमबाज म्हणून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला. अवघ्या एक वर्षापूर्वी अस्तिवात आलेली रायफल शूटिंग असोसिएशन आणि परिस्थितीशी लढून डॉ. बॅनर्जी या स्पर्धेत सहभागी झाले. मात्र, याच खेळात आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळण्यासाठी तब्बल २००८ सालपर्यंत वाट पहावी लागली.
>बीजिंग आॅलिम्पिक
या आॅलिम्पिकने भारतात ऐतिहासिक विक्रम घडला. हॉकीव्यतिरीक्त भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले होते. अभिनव बिंद्राचा १०.८ चा परफेक्ट शॉट आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या या शिलेदाराने जगभरातील अनेक नामवंत खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, १९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर भारताला पहिल्यांदाच सुवर्ण झळाळी लाभली. तसेच हे भारताचे पहिलेच वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक ठरले.

Web Title: India's golden light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.