भारताचे आॅसींना चोख उत्तर
By admin | Published: January 9, 2015 01:31 AM2015-01-09T01:31:15+5:302015-01-09T01:31:15+5:30
लोकेश राहुलचे कारकिर्दीतील पहिले शतक याच्या जोरावर भारताने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले.
चौथी कसोटी : कोहली व राहुलची शतके, भारत ५ बाद ३४२
सिडनी : कर्णधार विराट कोहलीचे मालिकेतील चौथे आणि सलामीवीर लोकेश राहुलचे कारकिर्दीतील पहिले शतक याच्या जोरावर भारताने चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले.
कालच्या १ बाद ७१ धावसंख्येवरून पुढे खेळताना कोहली (नाबाद १४०) व राहुल (११०) यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने आज तिसऱ्या दिवशी ९० षटकांच्या खेळात २७१ धावा फटकावल्या. भारताने दिवसअखेर ५ बाद ३४२ धावांची मजल मारली आहे. त्याआधी, आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ७ बाद ५७२ धावसंख्येवर घोषित केला. भारताला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २३० धावांची गरज असून, ५ विकेट शिल्लक आहेत. कोहलीने कारकिर्दीतील ३३वा सामना खेळताना १०वे शतक झळकावताना काही विक्रमांची नोंद केली. कोहलीने राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत असल्याचे चित्र दिसले. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी शतकवीर कोहलीला रिद्धिमान साहा (१४) साथ देत होता. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी केली.
भारताला या मालिकेत ०-३ ने पराभव टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखणे आवश्यक आहे. भारताची भिस्त कोहलीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कोहलीने २१४ चेंडूंना सामोरे जाताना २० चौकारांच्या मदतीने नाबाद १४० धावांची खेळी केली. कर्णधार म्हणून पहिल्या ३ डावांमध्ये शतकी खेळी करणारा कोहली जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला.
आजच्या शतकी खेळीदरम्यान कोहली सुदैवी ठरला. कोहली वैयक्तिक ५९ धावांवर असताना आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला होता. कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या २२ वर्षीय राहुलने संयमी फलंदाजी केली. राहुल दोनदा सुदैवी ठरला. स्मिथने त्याचा ४६ धावांवर असताना झेल सोडला होता. कोहली व राहुल यांच्या कामगिरीमुळे भारताला सुस्थिती गाठण्यात यश आले. अखेरच्या सत्रात राहुलची शतकी खेळी स्टार्कने संपुष्टात आणली. राहुलने २६२ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व १ षटकार ठोकला. त्यानंतर खेळपट्टीवर दाखल झालेल्या अजिंक्य रहाणेने (१३) कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. कोहलीने डावाच्या ९७व्या षटकात मालिकेतील चौथे व कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले. भारताला त्यानंतर एकापाठोपाठ २ धक्के बसले. वॉटसनने डावाच्या १००व्या षटकात रहाणे व सुरेश रैना (०) यांना तंबूचा मार्ग दाखविला. वॉटसनने रहाणेला पायचित केले, तर त्यानंतरच्या चेंडूवर रैनाला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर साहा व कोहली यांनी संयमी फलंदाजी करून डाव सावरला. भारताला फालोआॅन टाळण्यासाठी अद्याप ३१ धावांची गरज आहे.
त्याआधी, उपाहारानंतर राहुल व कोहली यांनी नैसर्गिक फलंदाजी केली. भारताला उपाहारापूर्वी केवळ ५१ धावांची भर घालता
आली. कोहली व राहुल यांनी उपाहारानंतर पहिल्या तासात ४५, तर दुसऱ्या तासामध्ये ६७ धावा वसूल केल्या.(वृत्तसंस्था)
च्कोहलीने एका मालिकेत ४ शतके झळकावण्याच्या सुनील गावसकर (वेस्ट इंडीजविरुद्ध १९७१ व १९७८-७९) यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. याचबरोबर कोहली हर्बर्ट सुटक्लिफे (१९२४-२५) व वाल्टर हेमंड (१९२८-२९) यांच्यानंतर आॅस्ट्रेलियन भूमीत मालिकेत ४ कसोटी शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.
स्टार्कला ताकीद
दुबई : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने चौथ्या कसोटी सामन्यात मुरली विजयला बाद केल्यानंतर जल्लोष करताना अत्युत्साह दर्शविला. आयसीसीने स्पष्ट केले, की मिशेल स्टार्कने भारताविरुद्ध खेळादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी त्याला ताकीद देण्यात आली.’
कोहलीचा विक्रम
च्भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याने चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात नाबाद १४० धावांची खेळी करताना आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला.
च्कोहलीने दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविडने २००३-०४च्या मालिकेत ८ डावांमध्ये ६१९ धावा फटकावल्या होत्या. कोहलीने ७ डावांमध्ये आतापर्यंत ६५९ धावा फटकावल्या आहेत.
च्मालिकेतील चौथे व कारकिर्दीतील १०वे शतक ठोकणाऱ्या कोहलीने कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांमध्ये तीन शतके झळकाविण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
‘स्पायडर कॅम’मुळे
झेल सुटला : स्मिथ
भारत व आॅस्ट्रेलियादरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात गुरुवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळात ‘स्पायडर कॅम’ चर्चेत होता. भारताचा शतकवीर लोकेश राहुलचा झेल या कॅमेऱ्यामुळे टिपण्यात अपयश आल्याचे संकेत यजमान संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने दिले.
क्षेत्ररक्षण निराशाजनक
गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे झाले, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमन यांनी व्यक्त केली. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळात कर्णधार स्टीव्हन स्मिथने दोन झेल सोडल्यामुळे भारताला सामन्यात परतण्याची संधी मिळाली.
मेलबोर्नमध्ये पदार्पणाच्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर टीकचे लक्ष्य ठरलेला भारताचा युवा फलंदाज लोकेश राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. या शतकी खेळीमुळे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया राहुलने व्यक्त केली. राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाला चोख उत्तर देता आले. कर्नाटकाचा हा २२ वर्षीय फलंदाज मेलबोर्नमध्ये पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे ३ व २ धावा काढून बाद झाला होता; पण एससीजीवर त्याने डावाची सुरुवात करताना शतकी खेळी केली.
च्मी खेळपट्टीवर जम बसविण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टी संथ असून आॅस्ट्रेलियन गोलंदाज धावा वसूल करण्याची संधी देत नव्हते. पहिल्या सत्रात खेळपट्टीवर टिकाव धरण्याची भूमिका अवलंबली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात धावा फटकावण्याची संधी मिळाली.
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ७ बाद ५७२ (डाव घोषित).
भारत पहिला डाव : मुरली विजय झे. हॅडीन गो. स्टार्क ०, लोकेश राहुल झे. व गो. स्टार्क ११०, रोहित शर्मा त्रि. गो. लियोन ५३, विराट कोहली खेळत आहे १४०, अजिंक्य रहाणे पायचित गो. वॉटसन १३, सुरेश रैना झे. हॅडीन गो. वॉटसन ०, रिद्धिमान साहा खेळत आहे १४. अवांतर : १२. एकूण : ११५ षटकांत ५ बाद ३४२. बाद क्रम : १-०, २-९७, ३-२३८, ४-२९२. ५-२९२. गोलंदाजी : स्टार्क : २१-४-७७-२, हॅरिस २३-६-६३-०, हेजलवूड २०-५-४५-०, लियोन ३२-७-९१-१, वॉटसन १५-४-४२-२, स्मिथ ४-०-१७-०.