भारताची पकड मजबूत
By admin | Published: August 1, 2016 05:26 AM2016-08-01T05:26:49+5:302016-08-01T05:27:38+5:30
लोकेश राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने शनिवारपासून विंडीजविरुद्ध प्रारंभ झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले.
किंग्स्टन : रविचंद्रन आश्विनचा (५ बळी) अचूक मारा व लोकेश राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने शनिवारपासून विंडीजविरुद्ध प्रारंभ झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. आश्विनने ५२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १८ व्यांदा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या यजमान विंडीज संघाचा डाव ५२.३ षटकांत १९६ धावांत संपुष्टात आला. ईशांत शर्मा (२-५३) व मोहम्मद शमी (२-२३) यांची आश्विनला योग्य साथ लाभली. प्रत्युत्तरात खेळताना भारताने दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १२६ धावांची मजल मारली होती. त्या वेळी भारताला विंडीजची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी केवळ ७० धावांची गरज होती. त्या वेळी अर्धशतक झळकावणारा सलामीवीर लोकेश राहुल (७५) याला चेतेश्वर पुजारा (१८) साथ देत होता. राहुलने सलामीला शिखर धवनच्या (२७) साथीने ८७ धावांची भागीदारी केली. त्याआधी, विंडीज संघातर्फे जर्मेइन ब्लॅकवूड (६२ धावा, ७ चौकार, ४ षटकार) व मर्लोन सॅम्युअल्स (३७) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना छाप सोडता आली नाही. ब्लॅकवूड व सॅम्युअल्स यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ४८.५ षटकात १ बाद १४५ धावा झाल्या होत्या. आर. राहूल नाबाद ८६ तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होता. राहुलने आघाडीला येऊन १८६ चेंडून ११ चौकार मारले होते.
>शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ४८.५ षटकात १ बाद १४५ धावा झाल्या होत्या. आर. राहूल नाबाद ८६ तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होता. राहुलने आघाडीला येऊन १८६ चेंडून ११ चौकार मारले होते.
>भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज : ब्लॅकवूड
किंग्स्टन : पहिला डावात आम्हाला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी रविवारी दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सामन्यात पुनरागमन करण्यास प्रयत्नशील असल्याचे मत विंडीजचा फलंदाज ब्लॅकवूडने व्यक्त केले. ब्लॅकवूडने कर्णधाराच्या निर्णयाचे समर्थन केले. ब्लॅकवूड म्हणाला, ‘सबिना पार्कची खेळपट्टी सुरुवातीला दोन तास फलंदाजांसाठी अनुकूल असते. ही खेळपट्टी थोडी वेगळी भासत असून या लढतीत गोलंदाजांना मदत मिळण्याची आशा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा नव्हता, पण आम्हाला संयम दाखवित फलंदाजी करणे आवश्यक होते.’’
>विंडीजच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले : आश्विन
किंग्स्टन : सबिना पार्कच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारण्याच्या विंडीजच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले, असे मत भारतीय फिरकीपटू आर. आश्विनने व्यक्त केले. आश्विनने पाच बळी घेत विंडीजचा डाव १९६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आश्विन म्हणाला, ‘नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य वाटले. सुरुवातीला तीन विकेट झटपट गमावल्यानंतर ब्लॅकवूडने प्रत्युत्तर दिल्यामुळे समतोल साधला गेला. ब्लॅकवूड व सॅम्युअल्स दरम्यानची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर आम्हाला वर्चस्व मिळवता आले.’’
धावफलक
वेस्ट इंडिज पहिला डाव :- क्रेग ब्रेथवेट झे. पुजारा गो. ईशांत ०१, आर. चंद्रिका झे. राहुल गो. शमी ०५, ड्वेन ब्राव्हो झे. कोहली त्रि. गो. ईशांत ००, मर्लोन सॅम्युअल्स झे. राहुल गो. आश्विन ३७, ब्लॅकवूड पायचित गो. आश्विन ६२, आर. चेज झे. धवन गो. शमी १०, एस. डोरिच झे. साहा गो. आश्विन ०५, जेसन होल्डर झे. राहुल गो. आश्विन १३, डी. बीशू झे. धवन गो. आश्विन १२, एम. क्युमिन्स नाबाद २४, एस. गॅब्रियल झे. कोहली गो. मिश्रा १५. अवांतर (१२). एकूण ५२.३ षटकांत सर्वबाद १९६. बाद क्रम : १-४, २-४, ३-७, ४-८८, ५-११५, ६-१२७, ७-१३१, ८-१५१, ९-१५८, १०-१९६. गोलंदाजी : ईशांत १०-१-५३-२, शमी १०-३-२३-२, आश्विन १६-२-५२-५, यादव ६-१-३०-०, मिश्रा १०.३-३-३८-१. भारत पहिला डाव :- के. एल. राहुल खेळत आहे ७५, शिखर धवन झे. ब्राव्हो गो. चेज २७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १८. अवांतर (६). एकूण ३७ षटकांत १ बाद १२६. बाद क्रम : १-८७. गोलंदाजी : गॅब्रियल ६-१-१८-०, क्युमिन्स ७-०-३१-०, होल्डर ८-२-२३-०, चेज ११-२-२८-१, बीशू २-०-१३-०, ब्रेथवेट ३-०-८-०.