भारताचा हार्दिक विजय : शेवटच्या चेंडूवर बांगलादेश पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 01:37 AM2016-03-24T01:37:31+5:302016-03-24T01:37:31+5:30

शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला

India's heart-wins: Bangladesh lose to the last ball | भारताचा हार्दिक विजय : शेवटच्या चेंडूवर बांगलादेश पराभूत

भारताचा हार्दिक विजय : शेवटच्या चेंडूवर बांगलादेश पराभूत

Next

विश्वास चरणकर,  बंगळुरू
शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला.शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या,हार्दिक पंड्याने चतुराईने चेंडू बाहेर टाकला. शुवागाताला हा चेंडू मारता आला नाही, चेंडू थेट धोनीकडे गेला. बांगलादेशच्या फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने जीवाच्या आकांताने पळत येवून यष्ट्या उडवल्याने मस्तफिजूर धावचित झाला, अन भारतीय खेळाडूंनी रंगारंग जल्लोष केला.
भारताने दिलेल्या १४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला शेवटच्या षटकांत विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. महमुदुल्लाहने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली यानंतर मुशफिकूर रहीमने सलग दोन चौकार ठोकून विजयाचा घास ओठावर आणला. पण हार मानेल ती टीम इंंडिया कसली ? चौथ्या चेंडूवर मुशफिकरने सामना संपवण्याच्या नादात फटका मारला. पण शिखर धवनने त्याचा झेल टीपला. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या महमुदुल्लाहने मुशफिकरच्या चुकीची पुनरावृत्ती केली. त्याने मारलेला फटका रविंद्र जडेजाने अत्यंत चपळाईने सूर मारत झेलला. बांगलादेशला आता शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन तर बरोबरीसाठी एक धाव हवी होती. पण या चेंडूवर धोनीने स्फूर्तीने मस्तफिजूरला धावचित केले.
ट्वेंटी २0 विश्वकप स्पर्धेत बुधवारी भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४६ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेश एका धावेने मागे पडला. मिथून आणि तमिम यांनी बांगलादेशच्या डावाची सुरवात केली. अश्विनने दुसऱ्याच षटकांत भारताला यश मिळवून दिले. अश्विनला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात मिथूनने पंड्याकडे झेल दिला. अश्विनच्या दुसऱ्या षटकांत तमिमचा उंच उडालेला झेल बुम्राहला झेलता आला नाही. या जीवदानानंतर तमिम इब्बालने बुम्राह झोडपून काढले. त्याने चार चौकारासह यात १६ धावा वसूल केल्या. तमिमची डोकेदुखी जडेजाने घालवली. धोनीने त्याला यष्टीचित केले. त्याने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या. रैनाच्या गोलंदाजीवर शब्बीर रेहमानही यष्टीचित झाला. धोनीच्या चपळाईमुळे शब्बीर बाद झाला. दरम्यान साकिब अल हसनला आर अश्विनने पांडयाच्या गोलंदाजीवर जीवदान दिले याचा आनंद साकिबने षटकार ठोकून साजरा केला. पण अश्विनने त्याला जास्त काळ आनंदात ठेवले नाही. बाराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडुवर साकिब रैनाकरवी झेलबाद झाला. तत्पूर्वी मशर्रफी मुर्तजाला जडेजाने ६ धावांवर बाद केले होते. या पराभवामुळे बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले.त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या बांगलादेशने भारताचा डाव ७ बाद १४६ धावांत रोखला.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. शब्बीर रहमान गो. मुस्तफीजूर १८, शिखर धवन त्रि. गो. शाकिब अल हसन २३, विराट कोहली त्रि. गो. शुवागाता २४, सुरेश रैना झे. शब्बीर रहमान गो. अल अमीन हुसेन ३०, हार्दिक पंड्या झे. सौम्या सरकार गो. अल अमीन १५, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३, युवराजसिंग झे. अमीन गो. महमदुल्लाह ३, रवींद्र जडेजा त्रि. गो. मुस्तफीजूर १२, रविचंद्रन अश्विन नाबाद ५, अवांतर ३, एकूण २० षटकांत ७ बाद १४६ धावा. गडी बाद क्रम : १/४२, २/४५, ३/९५, ४/११२, ५/११२, ६/११७, ७/१३७. गोलंदाजी : मर्शफी मूर्तझा ४-०-२२-०, शुवागता ३-०-२४-१, अल अमीन ४-०-३७-२, मुस्तफीजूर रहमान ४-०-३४-२, शाकिब अल हसन ४-०-२३-१, महमदुल्लाह १-०-४-१.
बांगला देश : तमीम इक्बाल यष्टिचित धोनी गो. जडेजा ३५, मोहम्मद मिथून झे. पंड्या गो. अश्विन १, शब्बीर रहमान यष्टिचित धोनी गो. रैना २६, शाकिब अल हसन झे. रैना गो. अश्विन २२, मशर्फी मूर्तझा त्रि. गो. जडेजा ६, महमदुल्लाह झे, जडेजा गो. पंड्या १८, सौम्या सरकार झे. कोहली गो. नेहरा २१,मुशफीकर रहीम झे, धवन गो. पंड्या ११, सुवागत होम नाबाद ००, मुस्तफीजूर रहमान धावबाद धोनी ००, अवांतर ५, एकूण : २० षटकांत ९ बाद १४५. गडी बाद क्रम : १/११, २/५५, ३/६९, ४/८७, ५/९५, ६/१२६, ७/१४५, ८/१४५, ९/१४५.गोलंदाजी : नेहरा ४-०-२९-१, जसप्रीत बुमराह ४-०-३२-०, अश्विन ४-०-२०-२, जडेजा ४-०-२२-२, पंड्या ३-०-२९-२, रैना १-०-९-१.
>> वुई वाँट सिक्स...
पॉवरप्लेचा खेळ संपत आला तरी भारताकडून षटकार घालण्यात आला नव्हता, मस्तफिजूरच्या षटकांत प्रेक्षकांतून वुई वाँट सिक्सर अशा घोषणा येवू लागल्या. या मागणीचा सन्मान करीत रोहीत शर्माने मुस्तफिजूरचा चेंंडू लाँगआॅफच्या स्टँडमध्ये भिरकावला. त्यानंतर पुन्हा प्रेक्षकातून वुई वाँट.... च्या आरोळ्या उठल्यानंतर शिखर धवनने याच षटकांत चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली.
विरुचे क्रेज कायम
भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीचे चाहते जगभर आहेत. भारतात तर तो आवडता खेळाडू आहे आहे. वीरू आता कॉमेंट्रेटरच्या भूमिकेत आला असला तरी त्याची क्रेझ कमी झालेली नाही. सामन्यापूर्वी तो मैदानावर सीमारेषेच्या जवळ उभा राहून चर्चा करीत असताना प्रेक्षक त्याला पाहून जल्लोष करीत होते. त्यामुळे अनेकदा चर्चेत अडथळा येत होता. वीरुने त्यांना शा्ंत राहण्याची विनंती केल्यावर प्रेक्षक शांत झाले अन चर्चा रंगली.
शहारुख खान बनला समालोचक!
भारत- बांगला देश सामन्यात बॉलिवूडचा बादशहा शहारुख खान याने पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या सोबतीने सामन्याचे समालोचन केले. सुरुवातीच्या ३० मिनिटांच्या खेळात शहारुखने स्वत:च्या आवाजात सामन्याचे धावते वर्णन केले. शहारुख कोलकाता येथील ईडन गार्डनवर भारत-पाक सामन्याला उपस्थित राहणार होता पण पूर्वनिर्धारित कार्यक्रमांमुळे सामन्याला हजर राहणे शक्य होणार नसल्याचे त्याने ऐनवेळी टिष्ट्वटरवर म्हटले होते. आज बेंगळुरु येथे जॅमपॅक असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शहारुखने हजेरी लावून चक्क समालोचन देखील केले.

Web Title: India's heart-wins: Bangladesh lose to the last ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.