भारतीय संघाचा दारुण पराभव

By admin | Published: July 9, 2017 02:59 AM2017-07-09T02:59:19+5:302017-07-09T02:59:19+5:30

सलामीवीर लिझेल ली हिने झळकावलेले आक्रमक अर्धशतक आणि कर्णधार डेन वॉन नीकर्क हिची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेट

India's heavy defeat | भारतीय संघाचा दारुण पराभव

भारतीय संघाचा दारुण पराभव

Next

लिसेस्टर : सलामीवीर लिझेल ली हिने झळकावलेले आक्रमक अर्धशतक आणि कर्णधार डेन वॉन नीकर्क हिची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या भारताचा ११५ धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २७३ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाचा केवळ १५८ धावांमध्ये डाव गुंडाळत आफ्रिकेने मोठा विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. स्मृती मानधना (४) झटपट परतल्यानंतर पूनम राऊत - दीप्ती शर्मा यांनी ४३ धावांची भागीदारी करून भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, पूनम २२ धावा काढून परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा काढून विश्वविक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली कर्णधार मिताली राज भोपळाही न फोडता बाद झाली. त्यानंतर लगेच हरमनप्रीत कौरही शून्यावर बाद झाली. वेदा कृष्णमूर्ती (३), शिखा पांड्ये (०) आणि सुषमा वर्मा (०) केवळ हजेरी लावून परतल्याने भारताची ७ बाद ६५ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. येथेच संघाचा पराभव निश्चित झाला होता. यानंतर, पुढच्या ९३ धावांमध्ये भारताचा डाव गुंडाळून आफ्रिकेने बाजी मारली. दरम्यान, दीप्ती शर्माने एकाकी झुंज देताना १११ चेंडंूत ५ चौकारांसह ६० धावा केल्या. झूलन गोस्वामीने ८८ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. आफ्रिकेची कर्णधार नीकर्कने २२ धावांत ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
तत्पूर्वी, सलामीवीर लिझेल ली आणि नीकर्क यांच्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक मजल मारली. लीने ६५ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाडताना ९२ धावांचा चोप दिला. मधल्या फळीत नीकर्कने मोक्याच्या वेळी अर्धशतक झळकावताना ६६ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५७ धावा केल्या. तसेच, इतर फलंदाजांनीही छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचे योगदान दिले. गोलंदाजीमध्ये शिखा पांड्ये ३, तर एकता बिष्ट आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. परंतु, इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने आणि धावांची खैरात केल्याने आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ९ बाद २७३ धावा (लिझेल ली ९२, डेन वॅन नीकर्क ५७; शिखा पांड्ये ३/४०, हरमनप्रीत कौर २/१८, एकता बिष्ट २/६८) वि. वि. भारत : ४६ षटकांत सर्व बाद १५८ धावा (दीप्ती शर्मा ६०, झूलन गोस्वामी नाबाद ४३; वॅन नीकर्क ४/२२).

Web Title: India's heavy defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.