भारताचे श्रीलंकेविरुद्ध पारडे जड

By Admin | Published: March 1, 2016 03:08 AM2016-03-01T03:08:17+5:302016-03-01T03:08:17+5:30

कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारखे प्रमुख खेळाडू दुखापतीने त्रस्त असले, तरी भारतीय संघ आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या

India's heavyweight against Sri Lanka | भारताचे श्रीलंकेविरुद्ध पारडे जड

भारताचे श्रीलंकेविरुद्ध पारडे जड

googlenewsNext

मिरपूर : कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारखे प्रमुख खेळाडू दुखापतीने त्रस्त असले, तरी भारतीय संघ आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या राऊंड रॉबिन लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
भारताने नुकत्याच मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत श्रीलंकेचा २-१ने पराभव केला होता. श्रीलंकेचा स्ट्राइक गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असून, स्पर्धेतील उर्वरित लढतींमध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
प्रभारी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने बांगलादेशाविरुद्धच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले, की लसिथ आगामी दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहील किंवा नाही, याची मला कल्पना नाही. कारण, त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली आहे.
गत विश्व टी-२० चॅम्पियनच्या आव्हानाबाबत चिंता करण्याऐवजी टीम इंडियाने खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाचा समतोल साधण्यावर भर दिला आहे.
कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाठीच्या दुखापतीनंतरही स्पर्धेत खेळत आहे. धोनी संघाच्या सराव सत्रांपासून दूर आहे. शिखर धवन टाचेच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी अनफिट ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत वेगवान गोलंदाज मोहंमद आमिरच्या यॉर्करवर रोहित शर्माच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. सावधगिरी बाळगून रोहितच्या अंगठ्याचा एक्स-रे करण्यात आला. त्यात कुठले फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले, हे नशीब. दोन्ही सलामीवीर दुखापतग्रस्त असल्यामुळे भारताच्या अंतिम संघाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या आठ टी-२० सामन्यांत भारतीय संघात विशेष बदल अनुभवायला मिळाला नाही. भारताने यंदाच्या मोसमात खेळलेल्या आठपैकी सात टी-२० सामन्यांत विजय मिळविला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सलामीला नवी जोडी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानविरुद्ध रोहित व अजिंक्य रहाणे यांनी डावाची सुरुवात केली होती; पण जर रोहित व धवन अनफिट ठरले, तर श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत डावाची सुरुवात करण्याची संधी रहाणे व पार्थिव पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे. पार्थिव पटेलने टी-२०मध्ये आयपीएलसाठी आपल्या फ्रँचायसीतर्फे डावाची सुरुवात केलेली आहे.
भारत-पाक लढतीत खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. त्यातुलनेत श्रीलंका आणि बांगलादेश या संघांविरुद्धच्या लढतीत खेळपट्टीकडून गोलंदाजांना तशी मदत मिळाली नाही. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल नसेल, तर फिटनेस मिळविण्याच्या समीप असलेल्या धवनला संधी मिळू शकते.
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ४९ धावांची संस्मरणीय खेळी केली होती; पण सुरेश रैनाची कामगिरी चिंतेचा विषय आहे. युवराजने गेल्या लढतीत अधिक धावा फटकावल्या नसल्या, तरी त्याच्या संघर्षपूर्ण खेळीची कर्णधाराने प्रशंसा केली आहे. युवराज विश्व टी-२०पूर्वी मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे.
धोनीला गेल्या २ लढतींमध्ये फलंदाजी करण्याची विशेष संधी मिळाली नव्हती; पण टी-२० क्रिकेटमध्ये केव्हाही त्याच्या आक्रमक फलंदाजीची गरज भासू शकते.
गोलंदाजीचा विचार करता, भारतासाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही. महिनाभरापासून आठ टी-२० सामने खेळणारा गोलंदाज आशिष नेहराला विश्रांती देण्यात येईल का, याबाबत उत्सुकता आहे. नेहराला विश्रांती देण्यात आली, तर संघव्यवस्थापन भुवनेश्वर कुमारला संधी देण्याची शक्यता आहे; पण गेल्या वर्षभरात भुवनेश्वरला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
युवा खेळाडू हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर टी-२० संघातील स्थान पक्के केले आहे. पंड्याने गोलंदाजी व फलंदाजीमध्ये विशेष छाप पाडली आहे. बुमराह वेगवान मारा करण्यात यशस्वी ठरला आहे. फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांचे अंतिम संघातील स्थान जवळजवळ पक्के आहे. धोनी आणि संघसंचालक रवी शास्त्री ही जोडी प्रयोग करण्याबाबत विचार करीत नाही तोपर्यंत हरभजनसिंग आणि पवन नेगी यांना संघात स्थान मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे संघर्ष करीत असलेल्या श्रीलंका संघाला कर्णधार मलिंगाच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेला बांगलादेशाविरुद्धच्या लढतीत २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवण्याच्या त्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)
सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ पासून.
> प्रतिस्पर्धी संघभारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, आशिष नेहरा, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, पार्थिव पटेल आणि भुवनेश्वर कुमार. श्रीलंका :- लसिथ मलिंगा (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, दिनेश चांदीमल, शेहान जयसूर्या, अँजेलो मॅथ्यूज, चामरा कपुगेदरा, नुवान कुलसेकरा, दासून चनाका, दुष्मंता चमिरा, मिलिंदा श्रीवर्धने, रंगना हेराथ, निरोशन डिकवेला, थिसारा परेरा, जेफ्री वांदरसे आणि सचित्र सेनानायके.

Web Title: India's heavyweight against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.