भारताची ऐतिहासिक कामगिरी

By Admin | Published: July 11, 2017 01:59 AM2017-07-11T01:59:55+5:302017-07-11T01:59:55+5:30

गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले

India's historical performance | भारताची ऐतिहासिक कामगिरी

भारताची ऐतिहासिक कामगिरी

googlenewsNext

भुवनेश्वर : यजमान भारताने २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करताना पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले. भारताने या वेळी लक्षवेधी कामगिरी करताना बलाढ्य चीनच्या वर्चस्वाला धक्का दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे १९८३ पासून या स्पर्धेत कायम अग्रस्थानी राहिलेल्या चीनची यंदा भारताच्या धडाक्यापुढे पीछेहाट झाली.
या स्पर्धेत भारताने विक्रमी पदकांची कमाई करताना १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ कांस्य अशी २९ पदकांची लयलूट केली. सहा जुलैला सुरू झालेल्या या चारदिवसीय स्पर्धेत भारताने पहिल्या दिवसापासून राखलेले वर्चस्व अखेरच्या दिवसापर्यंत कायम राखताना बाजी मारली. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही स्टार्स खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असल्याने त्याचा काहीसा फरक स्पर्धेवर नक्कीच पडला.
लंडनमध्ये होत असलेल्या आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या तयारीसाठी चीन, जपान, कतार आणि बहारिनच्या काही अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून आधीच माघार घेतली होती. या स्पर्धेत ४३ देशांतील एकूण ५६२ अ‍ॅथलिट्स सहभागी झाले होते. दरम्यान, स्पर्धा समारोपाच्या दिवशी आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष दहलान अल हमद यांनी ओडिशा सरकार आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे आभार व्यक्त करताना म्हटले की, ‘‘स्पर्धा शानदारपणे पार पडली. तुम्ही स्पर्धेचा स्तर आणखी वाढवला.’’ (वृत्तसंस्था)
>पदकविजेत्यांचा गौरव
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील भारताच्या सर्व पदकविजेत्यांना रोख पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान केला. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख, तर रौप्य आणि कांस्यविजेत्यांना अनुक्रमे ७ व ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा समारोप झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कलिंग स्टेडियमवर झालेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान पटनायक यांनी पदकविजेत्या खेळाडूंचा सम्मान केला. या वेळी भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राने म्हटले, ‘मुख्यमंत्री पटनायक यांच्याद्वारे झालेल्या सम्मानाने मी खूप आनंदी आहे. या आर्थिक पुरस्काराचा मला पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल. मी कलिंग स्टेडियमला कधीच विसरू शकत नाही.’
>वातावरणाचा परिणाम
या स्पर्धेदरम्यान राहिलेल्या उष्ण व
दमट वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम झाला. स्पर्धेच्या चार दिवसांदरम्यान केवळे एकच मीट रेकॉर्ड नोंदला गेला. भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने हा विक्रम रचला.
भारताने कामगिरी उंचावली...
स्पर्धेत यजमान भारताने चांगलेच वर्चस्व राखले. स्पर्धा इतिहासात आजपर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना भारतीयांनी सुपरपॉवर चीनला नमवले.
या वर्षी भारताने आपला सर्वाधिक ९४ खेळाडूंचा चमू स्पर्धेत उतरवला होता. याआधी जकार्ता १९८५ च्या स्पर्धेत भारताने २२ पदके मिळवत चांगली कामगिरी केली होती. तो विक्रम या वेळी भारतीयांनी मोडला.
आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, देशासाठी गर्वाची बाब, सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
- विजय गोयल,
केंद्रीय क्रीडामंत्री
भारताला अव्वल स्थानी आणल्याबद्दल सर्व अ‍ॅथलिट्सचे अभिनंदन. सर्वांचा खूप गर्व आहे.
- वीरेंद्र सेहवाग,
माजी क्रिकेटपटू

Web Title: India's historical performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.