भारताचे ऐतिहासिक सांघिक सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:59 AM2018-04-10T03:59:00+5:302018-04-10T04:26:37+5:30
भारतीय बॅडमिंटन संघाने सोमवारी तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले.
गोल्ड कोस्ट: भारतीय बॅडमिंटन संघाने सोमवारी तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राषष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. सात्त्विक रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा या मिश्र जोडीने पेंग सून चान-लियू योग मोह यांचा २१-१४, १५-२१, २१-१५ ने पराभव करीत यशस्वी सुरुवात केली. किदाम्बी श्रीकांतने तीनवेळेचा आॅलिम्पिक रौप्य विजेता ली चोंग वेई याच्यावर सरळ गेममध्ये २१-१७, २१-१४ ने मात केली.
पहिल्यांदा सहभागी झालेले रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या पुरुष दुहेरी जोडीला मात्र गोह आणि कियोनग टान या जोडीकडून १५-२१,२०-२२ अशा फरकाने पराभवाचे तोंड पहावे लागल्याने लढत रंगतदार अवस्थेत पोहोचली होती. तथापि अनुभवी सायना नेहवालने महिला एकेरीत सोनिया चिहचा २१-११,१९-२१,२१-९ असा पराभव करीत मलेशियाच्या आशेवर पाणी फेरले.
सायनाच्या विजयानंतर एन. सिक्की रेड्डी- अश्विनी पोनप्पा या दुहेरीच्या जोडीला खेळण्याची गरजही भासली नाही. याआधी भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत सांघिक रौप्य आणि २००६ मध्ये कांस्य जिंकले होते. एकेरीचे सामने ११ एप्रिलपासून सुरू होतील.
पीव्ही सिंधू
फिट - गोपीचंद
टाचेच्या दुखापतीमुळे सुवर्ण विजेत्या मिश्र संघाबाहेर राहिलेली आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता तंदुरुस्त असून एकेरीत खेळण्यास सज्ज असल्याचे राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी सांगितले. भारताने मलेशियाचा पराभव केल्यानंतर सिंधूच्या फिटनेसबद्दल विचारताच गोपीचंद म्हणाले,‘सिंधू आता ठीक आहे. ती एकेरीत खेळेल. सायना चांगला निकाल देत असल्यामुळे सिंधूला खेळविण्याची आम्ही जोखिम पत्करली नाही. सिंधूला हैदराबाद येथे सरावादरम्यान दुखापत झाली होती. या वेळी सिंधू खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी कोर्टवर उपस्थित होती.
राष्ट्रकुल पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
आॅस्ट्रेलिया ३९ ३३ ३४ १०६
इंग्लंड २२ २५ १६ ६३
भारत १० ०४ ०५ १९
न्यूझीलंड ०८ ०९ ०६ २३
द. आफ्रिका ०८ ०५ ०५ १८
भारोत्तलनमध्ये ‘चंदेरी’ यश
भारोत्तोलनमध्ये भारतीयांची शानदार कामगिरी कायम राहिली. सोमवारी या क्रीडा प्रकाराची सांगता सांगता प्रदीप सिंगने (१०५ किलो) रौप्यपदक पटकावित केली. भारताने भारोत्तोलनमध्ये पाच सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदक अशी एकूण ९ पदकांची लयलूट केली. भारोत्तोलनमध्ये अखेरच्या दिवशी प्रदीप कुमारचे थोड्या फरकाने सुवर्णपदक हुकले. त्याने ३५२ किलो (१५२ + २०० किलो) वजन पेलताना दुसरे स्थान पटकावले.