भारताच्या आशा कायम
By Admin | Published: March 7, 2017 12:36 AM2017-03-07T00:36:32+5:302017-03-07T00:36:32+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेत आशा कायम राखल्या
बंगळुरू : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेत आशा कायम राखल्या. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी भारताने दुसऱ्या डावात ४ बाद २१३ धावांची मजल मारली होती. भंगणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघ आता आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांत गुंडाळला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मालिकेत प्रथमच भारताने विकेट न गमावता एक सत्र खेळून काढले. राहुल व पुजाराची जोडी लियोनने फोडली. पहिल्या स्लिपमध्ये तैनात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपत राहुलची खेळी संपुष्टात आणली. राहुलने अर्धशतकी खेळीदरम्यान कसोटी कारकिर्दीत एक हजार धावांचा पल्ला गाठला.
रहाणेने दडपणाखाली आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाची खेळी केली. भारताची ४ बाद १२० अशी अवस्था असताना पुजाराला साथ देण्यासाठी रहाणे खेळपट्टीवर आला. या जोडीने फटके खेळताना सावधगिरी बाळगली. त्यांनी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. या दोघांनी फिरकीपटू नॅथन लियोन (६९ धावांत बळी नाही) आणि स्टीव्ह ओकीफे (२८ धावांत १ बळी) यांचा मारा समर्थपणे खेळून काढला.
आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुड (३-५७) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अभिनव मुकुंद (१६) व रवींद्र जडेजा (२) यांना क्लीन बोल्ड केले. भारतीय कर्णधार विराट कोहली (१५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. मैदानी पंच नायजेल लाँग यांनी चहापानाला पाच षटकांचा अवधी शिल्लक असताना हेजलवुडच्या गोलंदाजीवर त्याला पायचित बाद दिले. कोहलीने चेंडू बॅटला लागल्याचा इशारा करताना डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. टीव्ही पंच रिचर्ड केटलबोरोने यांनी चेंडू प्रथम बॅटला लागला की पॅडला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगताना मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. कोहलीने मैदान सोडताना नाराजी व्यक्त केली. कोहली पहिल्या कसोटी सामन्यात शून्य व १३ धावा काढून बाद झाला होता, तर या कसोटीत पहिल्या डावात १२ धावांवर बाद झाला.
त्याआधी, सकाळच्या सत्रात जडेजाने १० चेंडूंमध्ये तीन बळी घेत आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी परतवले. भारताने आॅस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांत गुंडाळला. रविचंद्रन आश्विनने (२-८४) सर्वप्रथम स्टार्कला (२६) माघारी परतवले. त्यानंतर जडेजाने (६-६३) मॅथ्यू वेड (४०), नॅथन लियोन (००) आणि हेजलवुड (०१) यांना बाद केले. फलंदाजीसाठी खडतर असलेल्या या खेळपट्टीवर आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
>पुजारा, राहुल, रहाणेची लढवय्या खेळी
पुजाराने लढवय्या खेळी केली, तर सलामीवीर लोकेश राहुलने (५१) या लढतीत सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावताना महत्त्वाचे योगदान दिले. या कसोटीत पुजारा व अजिंक्य रहाणे (नाबाद ४०) यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ९३ धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक ठरू शकते.
पुजाराने १७३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार लगावले, तर रहाणेने १०५ चेंडूंमध्ये ३ चौकार मारले. राहुलने चमकदार फलंदाजी करताना ८५ चेंडूंमध्ये चार चौकार ठोकले. त्याने वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले.
>धावफलक
भारत पहिला डाव : १८९. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. आश्विन ३३, मॅट रेनशॉ यष्टिचीत साहा गो. जडेजा ६०, स्टीव्ह स्मिथ झे. साहा गो. जडेजा ८, शॉन मार्श झे. नायर गो. यादव ६६, पीटर हँड्सकोम्ब झे. आश्विन गो. जडेजा १६, मिशेल मार्श पायचीत गो. ईशांत ०, मॅथ्यू वेड पायचित गो. जडेजा ४०, मिशेल स्टार्क झे. जडेजा गो. आश्विन २६, स्टीव्ह ओकिफी नाबाद ४, नाथन लियोन पायचित गो. जडेजा ०, जोश हेजलवूड झे. राहुल गो. जडेजा १. अवांतर : २२. एकूण : १२२.४ षटकांत सर्व बाद २७६. बाद क्रम : १-५२, २-८२, ३-१३४, ४-१६०, ५-१६३, ६-२२०, ७-२६९, ८-२७४, ९-२७४. गोलंदाजी : ईशांत शर्मा २७-८-४८-१, उमेश यादव २४-७-५७-१, आश्विन ४९-१३-८४-२, जडेजा २१.४-१-६३-६, नायर १-०-७-०.
भारत दुसरा डाव :- लोकेश राहुल झे. स्मिथ गो. ओकिफी ५१, अभिनव मुकुंद त्रि. गो. हेजलवूड १६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ७९, विराट कोहली पायचीत गो. हेजलवूड १५, रवींद्र जडेजा त्रि. गो. हेजलवूड २, अजिंक्य रहाणे खेळत आहे ४०. अवांतर : १०. एकूण ७२ षटकांत ४ बाद २१३. बाद क्रम : १-३९, २-८४, ३-११२, ४-१२०. गोलंदाजी : स्टार्क १०-०-४५-०, हेजलवूड १६-०-५७-३, लियोन २७-२-६९-०, ओकिफी १६-३-२८-१, मिशेल मार्श ३-०-४-०.