Diamond League : लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:03 PM2024-08-22T15:03:39+5:302024-08-22T15:11:53+5:30
neeraj chopra diamond league 2024 : आज नीरज चोप्रा ९० मीटर भाला फेकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Lausanne Diamond League 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकेल असे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक कामगिरी करताना ९२ मीटरहून अधिक लांब भाला फेकला. तिथेच भारताच्या हातून सुवर्ण निसटल्याचे जवळपास निश्चित झाले होते. (Javelin throw live times) पहिल्या प्रयत्नात नीरज अपयशी ठरला. मग दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकून रौप्य पदक पटकावले. नीरजला सुवर्ण पदकाचा बचाव करता आला नसला तरी त्याच्या रूपात भारताला एकमेव रौप्य मिळाले. (Diamond League 2024 News In Marathi) आता नीरज पुन्हा एकदा मैदानात असणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री स्वित्झर्लंडच्या लुसाने येथे डायमंड लीगचा थरार रंगेल. भारतीय वेळेनुसार नीरज मध्यरात्री १२.२२ मिनिटांनी भाला फेकेल. (Lausanne Diamond League 2024)
नीरजने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ऑलिम्पिक २०२४ मध्ये केली. पण तरीही त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावले. डायमंड लीग २०२४ मध्ये नीरज ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न करेल. त्याला अद्याप एकदाही एवढ्या लांब भाला फेकता आला नाही. नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये त्याने ८८.३६ मीटर भाला फेकला होता. लुसाने डायमंड लीग ही हंगामातील शेवटची डायमंड लीग असणार आहे. यानंतर नीरज सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेईल, या दरम्यान त्याच्या कंबरेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते. (Where to watch Lausanne Diamond League 2024 live in India)
नीरजची मॅच कुठे पाहाल?
आज रात्री नीरजचा सामना सुरू होईल. भारतीय वेळेनुसार १२.२२ मिनिटांनी त्याची मॅच सुरू होईल. हा थरार चाहत्यांना स्पोर्ट्स १८ आणि जियो सिनेमावर पाहता येईल. या डायमंड लीगमध्ये असे पाच खेळाडू सहभागी झाले आहेत, जे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टॉप-६ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले होते. यामध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या अँडरसन पीटर्सचाही समावेश आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अर्शद नदीम या लीगचा भाग असणार नाही. त्यामुळे नीरजला स्पर्धा जिंकण्याची 'सुवर्ण'संधी आहे.
प्रदीर्घ काळापासून मांडीच्या दुखापतीने ग्रस्त राहिल्यानंतर नीरजने ८ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटरची फेक करत रौप्य पटकावले होते. नीरजने शनिवारी डायमंड लीगच्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०२२ मध्ये नीरजने डायमंड लीग स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी मात्र त्याला अमेरिकेत झालेल्या डायमंड लीग अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाड्लेचनंतर दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.