ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास

By admin | Published: July 11, 2016 06:33 PM2016-07-11T18:33:01+5:302016-07-11T18:33:01+5:30

भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

India's journey in the Olympics | ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास

ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास

Next
>काऊंटडाऊन रिओ ऑलिंपिक - २४ डेज टू गो
शिवाजी गोरे
ऑनलाइन लोकमत, पुणे
भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १४ खेळांतील १०६ खेळाडूंनी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली पात्रता पूर्ण केली आहे. आतापर्यंतच्या आॅलिम्पिकच्या मागील इतिहासात भारताचा एवढा मोठा संघ कधी सहभागी झाला नव्हता. या आॅलिम्पिकमध्ये किमान २0 पदके मिळावित हे भारतीय क्रीडा मंत्रालय आणि आयओएचे लक्ष्य आहे. भारताचे हे जम्बो पथक त्यात कितपत यशस्वी ठरतेय ते पहावे लागेल.    
ऑलिम्पिक स्पर्धा म्हटले, की क्रीडा क्षेत्रातील जगातला सर्वांत मोठा कुंभमेळा म्हणता येईल. या स्पर्धेत आपल्या देशाकडून प्रतिनिधीत्व करावे, हे सर्व खेळाडूंचे (क्रिकेट सोडून) स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू जिगरीने प्रयत्न करीत असतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. पण तरीसुद्धा काही वेळा त्याला या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. काही खेळाडू आॅलिम्पिकची पात्रता पूर्ण करीत नाही, तर काही खेळाडू राजकारणास बळी पडले आहेत. पण या वर्षी भारतातील १०६ खेळाडूंनी ऑलिम्पिक महासंघाने दिलेली पात्रता पूर्ण केली आहे. 
यामध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडूने रिओचे तिकीट मिळविले आहे. यापूर्वी २०१२ लंडन आॅलिम्पिकसाठी १३ क्रीडाप्रकारांत ८३, २००८ मध्ये बीजिंगसाठी १२ क्रीडाप्रकारांसाठी ५७, २००४ मध्ये अथेन्ससाठी १४ क्रीडाप्रकारांत ७३, २००० मध्ये सिडनीसाठी ८ क्रीडाप्रकारांत ६५, १९९६ मध्ये अ‍ॅटलांटामध्ये १३ क्रीडाप्रकारांसाठी ४९, तर १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ खेळाडू पात्र झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये लंडन येथे भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली होती. बीजिंग येथे एक सुवर्ण (अभिनव बिंद्रा) व दोन कांस्य, अथेन्स येथे एक रौप्य, सिडनी येथे एक कांस्य, अ‍ॅटलांटा येथे एक कांस्यपदक जिंकले होते. 
आॅलिम्पिक महासंघाच्या माहितीनुसार भारताला पहिली दोन रौप्यपदके जिंकून दिली होती. पॅरिस येथे १९०० मध्ये झालेल्या प्राचीन आॅलिम्पिकमध्ये. नॉर्मन प्रिचार्ड यांनी २०० मीटर धावणे व २०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर १९२० मध्ये अ‍ॅन्टवेर्प (बेल्जियम) येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे अ‍ॅथलेटिक्समध्ये पूर्मा बॅनर्जी, पेड्डाप्पा चौघुले व सदाशिव दातार यांच्यासह कुस्तीमध्ये कुमार नवले व रणधीर शिंदे सहभागी झाले होते. 
भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९८० दरम्यान ८ सुवर्ण, १ रौप्य व दोन कास्यपदके जिंकली आहे. 
 १९९६ मध्ये भारताच्या लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यानंतर २००० मध्ये सिडनी येथे भारताची महिला खेळाडू करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. २००४ अथेन्स येथे भारताचा नेमबाजपटू राजवर्धनसिंह राठोडने आपल्या देशाला पुरुषांच्या हबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकून दिले. त्याच्याच पुढच्या वर्षी बीजिंगमध्ये ैअभिनव बिंद्राने पुरुषांच्या १० मी. एअररायफल प्रकारात सुवर्ण, विजेंदरसिंहने मिडलवेट ७५ किलो गटात कांस्य व सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. भारतीय खेळाडूंनी प्रथमच एका ऑलिम्पिक स्पर्धेत तीन पदके जिंकली होती. २०१२ मध्ये भारताच्या विजयकुमारने २५ मी., रॅपिड फायर प्रकारात, तर सुशीलकुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल प्रकारात  रौप्य, गगन नारंगने पुरुषांच्या १० मी. एअररायफल व महिलांच्या गटात सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत मेरी कोमने मुष्टियुद्ध प्रकारात फ्लायवेटमध्ये  योगेश्वर दत्ताने ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 
आता यावर्षी पुढील महिन्यात रिओमध्ये १४ विविध क्रीडाप्रकारांत भारताचा १०६ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. पाहू या वेळी भारताला किती पदके मिळतात?

Web Title: India's journey in the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.