भारताची विजयाकडे कूच
By admin | Published: February 13, 2017 12:14 AM2017-02-13T00:14:36+5:302017-02-13T00:14:36+5:30
भारताने दिलेल्या ४५९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची रविवारी चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १०३ अशी स्थिती झाली आहे.
हैदराबाद : भारताने दिलेल्या ४५९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची रविवारी चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १०३ अशी स्थिती झाली आहे. यजमान संघाने येथे खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने कूच केली आहे. बांगलादेश संघ विजयासाठी आवश्यक ३५६ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करण्यापेक्षा सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी ९० षटके खेळून सामना अनिर्णीत राखण्यास प्रयत्नशील राहील. आजचा खेळ थांबला, त्या वेळी शाकिब-अल-हसन (२१) आणि महमुदुल्लाह रियाज (९) खेळपट्टीवर होते.
भारताने पहिला डाव ६ बाद ६८७ धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशचा पहिला डाव आज ३८८ धावांत संपुष्टात आला. भारताने फॉलोआॅन न देता फलंदाजी करताना दुसरा डाव ४ बाद १५९ धावसंख्येवर घोषित केला.
रविवारी चहापानाच्या विश्रांतीनंतर दुसरा डाव प्रारंभ करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. तमिम इक्बाल (३) झटपट माघारी परतला. त्यानंतर जडेजाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये तैनात अजिंक्य रहाणेने सौम्या सरकारचा (४२) अफलातून झेल टिपताना बांगलादेशला दुसरा धक्का दिला. सरकार व मोमिनुल (२७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.
आश्विनने मोमिनुलचा अडथळा दूर करीत बांगलादेशची ३ बाद ७५ अशी अवस्था केली. सर्वाधिक वेगवान २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या आश्विनने १६ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. दुसऱ्या डावात आश्विनचे चेंडू चांगले वळत आहेत. नव्या चेंडूने त्याला उसळीही अधिक मिळाली.
त्याआधी, उपाहारानंतर चेतेश्वर पुजाराच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत ४ बाद १५९ धावांची मजल मारीत दुसरा डाव घोषित केला. पुजाराने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावांची खेळी केली. विराट कोहलीने ४० चेंडूंमध्ये ३८ धावांचे योगदान दिले.
सकाळच्या सत्रात भारताने बांगलादेशचा पहिला डाव ३८८ धावांत गुंडाळल. यजमान संघाने २९९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मुरली विजय (७) व लोकेश राहुल (१०) यांना तास्किनने झटपट माघारी परतवले.
त्यानंतर पुजाराने कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. कोहलीला शाकिबने तंबूचा मार्ग दाखवला. अजिंक्य रहाणे (२५) शाकिबचा दुसरा बळी ठरला.
भारतातर्फे पहिल्या डावात उमेश यादव (३-८४) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. आश्विन व जडेजाने प्रत्येकी दोन तर ईशांत व भुवनेश्वरने प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
रहीमची कप्तानी खेळी
खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतरही गोलंदाजीची बाजू बघता भारतीय संघ उर्वरित सात बळी घेण्यास सक्षम भासत आहे.
सामना अनिर्णीत राखण्यासाठी बांगलादेशच्या आशा नाबाद जोडी शाकिब अल हसन व महमुदुल्लाह यांच्यासह पहिल्या डावातील शतकवीर मुशफिकर रहीम यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
च्कर्णधार मुशफिकर रहीमच्या (१२७) संघर्षपूर्ण शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला पहिल्या डावात ३८८ धावांची मजल मारता आली. आश्विनने सर्वांत वेगवान २५० बळींचा टप्पा गाठण्याचा विक्रम नोंदवला. आश्विनने मुशफिकरला बाद करीत हा विक्रम नोंदवला. मुशफिकरने पाचवे कसोटी शतक झळकावताना २६२ चेंडूंना सामोरे जात १६ चौकार व २ षटकार लगावले.
भारत पहिला डाव ६ बाद ६८७ (डाव घोषित)
बांगलादेश पहिला डाव : तमिम इक्बाल धावबाद २५, सौम्या सरकार झे. साहा गो. यादव १५, मोमिनुल हक पायचित गो. यादव १२, महमुदुल्लाह पायचित गो. ईशांत २८, शाकिब अल-हसन झे. यादव गो. आश्विन ८२, मुशफिकर रहीम झे. साहा गो. आश्विन १२७, शब्बीर रहमान पायचित गो. जडेजा १६, मेहदी हसन मिराज त्रि. गो. भुवनेश्वर ५१, ताइजुल इस्लाम झे. साहा गो. यादव १०, तास्किन अहमद झे. रहाणे गो. जडेजा ०८, कामरुल इस्लाम रब्बी नाबाद ००. अवांतर (१५). एकूण १२७.५ षटकांत सर्वबाद ३८८. बाद क्रम : १-३८, २-४४, ३-६४, ४-१०९, ५-२१६, ६-२३५, ७-३२२, ८-३३९, ९-३७८, १०-३८८. गोलंदाजी : भुवनेश्वर २१-७-५२-१, ईशांत २०-५-६९-१, आश्विन २८.५-७-९८-२, यादव २५-६-८४-३, जडेजा ३३-८-७०-२.
भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. मुशफिकुर गो. तास्किन ०७, लोकेश राहुल झे. मुशफिकुर गो. तास्किन १०, चेतेश्वर पुजारा नाबाद ५४, विराट कोहली झे. महमुदुल्लाह गो. शाकिब ३८, अजिंक्य रहाणे त्रि. गो. शाकिब २८, रवींद्र जडेजा नाबाद १६. अवांतर (६). एकूण २९ षटकांत ४ बाद १५९ (डाव घोषित). बाद क्रम : १-१२, २-२३, ३-९०, ४-१२८. गोलंदाजी : ताइजुल ६-१-२९-०, तास्किन ७-०-४३-२, शाकिब ९-०-५०-२, मेहदी ७-०-३२-०.
बांगलादेश दुसरा डाव : तमिम इक्बाल झे. कोहली गो. आश्विन ०३, सौम्य सरकार झे. रहाणे गो. जडेजा ४२, मोमिनुल हक झे. रहाणे गो. आश्विन २७, महमुदुल्लाह खेळत आहे ०९, शाकिब-अल-हसन खेळत आहे २१. अवांतर (१). एकूण ३५ षटकांत ३ बाद १०३. बाद क्रम : १-११, २-७१,
३-७५. गोलंदाजी : भुवनेश्वर ५-२-१४-०, आश्विन १६-६-३४-२, ईशांत ३-०-१९-०, यादव ३-०-९-०, जडेजा ८-२-२७-१.