भारतासाठी अखेरचे ‘कूल’ नेतृत्व दिसणार
By admin | Published: January 7, 2017 04:25 AM2017-01-07T04:25:25+5:302017-01-07T04:25:25+5:30
एकदिवसीय मालिकेआधी भारत ‘अ’ आणि इंग्लंड इलेव्हन यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सराव सामने खेळविण्यात येणार आहेत.
मुंबई : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी भारत ‘अ’ आणि इंग्लंड इलेव्हन यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सराव सामने खेळविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, नुकताच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला महेंद्रसिंग धोनी पहिल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार असून, भारतीय संघासाठी हे त्याचे अखेरचे नेतृत्व असेल. तर दुसऱ्या सराव सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल.
सराव सामन्यासाठी युवा व अनुभवी खेळाडूंची निवड करताना निवड समितीने सर्व पर्याय आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असेल.
या सराव सामन्यांसाठी नऊ महिन्यांनी संघात पुनरागमन केलेल्या युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांचीही निवड करण्यात आली
आहे.
दोघांनीही गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर नेहराने ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया केली. तेव्हापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नसून, तो सहा महिन्यांनंतर पुनरागमन करीत आहे.
तसेच, इंग्लंडविरुध्दच्या कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या हार्दिक पांड्याची सरावासाठी भारत ‘अ’ संघात निवड झाली आहे. रणजी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केलेल्या दिल्लीकर युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची रहाणेच्या नेतृत्वाखालील ‘अ’ संघात निवड झाली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
>गेल्या दोन महिन्यांमध्ये धोनीने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर होणाऱ्या या दोन सराव सामन्यांपैकी पहिल्या १० जानेवारीला होणाऱ्या सामन्यात धोनी संघाचे नेतृत्व करेल. १२ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात रहाणे कर्णधारपदी असेल.
>भारत ‘अ’ संघ :
पहिला सराव सामना : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीप सिंग, अंबाती रायडू, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा आणि एस. कौल.
दुसरा सराव सामना : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, सुरेश रैना, दीपक हुड्डा, इशान किशन, शेल्डन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, विनय कुमार, प्रदीप सांगवान आणि अशोक दिंडा.