मितालीकडे भारताचे नेतृत्व
By admin | Published: January 25, 2017 12:29 AM2017-01-25T00:29:31+5:302017-01-25T00:29:31+5:30
कोलंबो (श्रीलंका) येथे ७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी मिताली राजकडे भारतीय संघाचे नेतृत्व
दुबई : कोलंबो (श्रीलंका) येथे ७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी मिताली राजकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतापुढे पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि यजमान श्रीलंका या प्रमुख संघांचे आव्हान असेल.
या स्पर्धेतून या वर्षी २४ जून ते २४ जुलैदरम्यान इंग्लंड व वेल्स येथे रंगणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी चार संघ पात्र ठरतील. त्याचबरोबर अव्वल ४ संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रासाठीही आपली जागा निश्चित करतील.
तर, पाचव्या व सहाव्या स्थानी राहणाऱ्या संघांना पुढील ४ वर्षांसाठी एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त होईल.
तसेच, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत आॅस्टे्रलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांनी अव्वल ४ स्थान पटकावताना विश्वकप स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला.
पात्रता स्पर्धेत भारताचा समावेश ‘अ’ गटात असून त्यामध्ये यजमान श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि थायलंड यांचाही समावेश आहे. भारताची मुख्य वेगवान गोलंदाज मदार झूलन गोस्वामी आणि कर्णधार मिताली यांच्यावर असेल. जागतिक एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत झूलन अव्वल गोलंदाज असून मिताली फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)