भारताचे आघाडीचे खेळाडू राबत आहेत शेतामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:13 AM2020-05-02T04:13:39+5:302020-05-02T06:45:16+5:30
लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग थांबले असताना क्रीडाविश्वालाही ब्रेक लागला आहे. सर्वच क्षेत्रांतील व्यवहार थांबले असले, तरी कृषी क्षेत्र मात्र सुरू आहे. परंतु, यामध्येही शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना पीक कापणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आता शेतकरी कुटुंबातील खेळाडूंनीच शेतात उडी घेतल्याचे पाहण्यास मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत.
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता रिंकू हुड्डाने म्हटले की, ‘मशीनच्या मदतीने गहू पिकाची कापणी करण्याचे माझे काम आहे. ९ एकरच्या गहू पिकाची कापणी मशीनद्वारे पूर्ण झाली आहे. आता अर्धा एकरची कापणी शिल्लक आहे. आशा आहे की पावसाच्या आधी गव्हाच्या पॅकिंगचेही काम पूर्ण होईल.’ अनेक आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धांत भारताच्या पदकांचे स्वप्न पूर्ण केलेल्या अमित पंघालने म्हटले की, ‘मी शेतकरी पुत्र असून शेतकामातून मला समाधान मिळत आहे.’ अमित सध्या रोहतक येथील आपल्या मान्या या गावी आहे. लॉकडाउनदरम्यान तो आपल्या घरच्यांना शेतकामामध्ये मदत करीत आहे. अमितने सांगितले की, ‘मी नेहमीच माझ्या परिवाराची न सांगताच मदत करीत असतो. बॉक्सिंगमुळे मला दरवेळी गहू कापणीच्या वेळी गावाबाहेर राहावे लागले आहे. मात्र आता लॉकडाउनमुळे मी माझ्या गावी असून परिवारासोबत गहू कापणी आणि पॅकिंग करीत आहे. शेतकरी पुत्र असल्याने मला या कामामध्ये समाधान मिळत आहे.’
२०० आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळलेली पूनम मलिकही लॉकडाउनमुळे आपल्या गावी उमरा येथे आहे. तीदेखील शेतकामामध्ये व्यस्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला तिने सांगितले की, ‘लॉकडाउनमुळे सर्वच खेळ थांबले आहेत. लॉकडाउनमुळे गहू कापणीसाठी मजूरही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे परिवारासह शेतात जाऊन मी कापणीचे काम करीत आहे.’ विशेष म्हणजे पूनमने पहिल्यांदाच कापणीच्या कामाचा अनुभव घेतला आहे. (वृत्तसंस्था)
>मनोजही करतो कापणी
दोनवेळा आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला बॉक्सर मनोज कुमारही सध्या आपल्या शेतात राबत आहे. १९९९ सालानंतर केवळ दुसऱ्यांदाच तो गहू कापणीच्या वेळी आपल्या गावी (राजौद) उपस्थित आहे. लहानपणी त्याने अनेकदा गहू पिकाची कापणी केली आहे. मात्र यंदा लॉकडाउनमुळे तो आपल्या परिवाराला शेतकामामध्ये मदत करीत आहे. ‘मजूर मिळत नसल्याने, खºया अर्थाने मी शेतकरी म्हणून काम करीत आहे,’ असे मनोजने सांगितले.