बाराबती मैदान दहा वर्षांत भारतासाठी ‘लकी’

By admin | Published: January 18, 2017 04:18 AM2017-01-18T04:18:01+5:302017-01-18T04:18:01+5:30

भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांत कुठले मैदान सर्वांत ‘लकी’ ठरले असेल तर ते आहे कटकचे बाराबती स्टेडियम.

India's 'Lucky' for ten years in Barabati ground | बाराबती मैदान दहा वर्षांत भारतासाठी ‘लकी’

बाराबती मैदान दहा वर्षांत भारतासाठी ‘लकी’

Next


कटक : भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांत कुठले मैदान सर्वांत ‘लकी’ ठरले असेल तर ते आहे कटकचे बाराबती स्टेडियम. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मैदानावर उद्या, गुरुवारी दुसरा वन-डे सामना खेळायचा आहे.
गेल्या दहा वर्षांत भारताने बाराबती स्टेडियममध्ये खेळलेल्या पाचही वन-डे सामन्यांत विजय मिळविला आहे. त्यापैकी एक लढत भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्यात भारताने ६ गडी राखून सरशी साधली होती. गेल्या दहा वर्षांत बाराबती असे एकमेव स्टेडियम आहे, की जेथे भारताने पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आणि सर्वच सामन्यांत विजय मिळविला.
या स्टेडियममध्ये भारताला अखेरचा पराभव नोव्हेंबर २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्वीकारावा लागला होता. सध्याच्या संघातील केवळ एक सदस्य युवराजसिंग त्या लढतीत खेळला होता. त्यानंतर भारताने या मैदानावर वेस्ट इंडिज व श्रीलंका या संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा, तर इंग्लंडचा एकदा पराभव केला आहे. दरम्यान, आॅस्ट्रेलियाविरुद्धची एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावी लागली होती.
गेल्या दहा वर्षांत भारताने सर्वाधिक १२-१२ सामने आरपीएस कोलंबो आणि दाम्बुला येथे खेळले आहेत. कोलंबोमध्ये भारताने नऊ सामने जिंकले, तर तीन सामने गमावले. दाम्बुलामध्ये सात सामन्यांत विजय मिळविला, तर पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, हरारे स्पोर्टस् क्लबवर भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तेथे खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांपैकी नऊ सामन्यांत विजय मिळविला, तर दोन सामने गमवावे लागले. पोर्ट आॅफ स्पेनमध्ये आठपैकी सहा सामने जिंंकले, तर दोन सामने गमावले.
भारतीय मैदानाचा विचार करता या कालावधीत भारताने बाराबतीव्यतिरिक्त दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्येही पाच सामने जिंंकले, पण दरम्यान एक लढत गमावली. एका लढतीचा निकाल शक्य झाला नाही. भारताने या कालावधीत बंगलोर, चेन्नई, मोहाली आणि विशाखापट्टणम येथेही पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले; पण प्रत्येकी चार सामन्यांत विजय मिळविता आला.
बाराबतीमध्ये भारताने एकूण १५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ११ सामने जिंंकले, तर चार सामने गमावले. इंग्लंडने येथे पाच वन-डे सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत त्यांनी विजय मिळविला. त्यात १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या नेहरू कप लढतीचाही समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान या मैदानावर आतापर्यंत चार सामने खेळले गेले आणि कामगिरी २-२ अशी आहे.
अजिंंक्य रहाणे व शिखर धवन यांनी येथे यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत शतके झळकाविली होती. श्रीलंकेविरुद्ध नोव्हेंबर २०१४ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या लढतीत रहाणे (१११) व धवन (११३) यांनी चमकदार कामगिरी करताना सलामीला २३१ धावांची भागीदारी केली होती. भारताने त्यावेळी ५ बाद ३६३ धावांची मजल मारली होती. या मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्या खेळीपासून प्रेरणा घेत धवन फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नशील राहील. या डावखुऱ्या फलंदाजाने पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात केवळ एक धाव केली होती. (वृत्तसंस्था)
>दुसऱ्या वन-डे पूर्वी दव ठरले चिंतेचे कारण
पुणेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत तीन गडी राखून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी १९ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत ‘दव’ हा घटक चिंतेचे कारण ठरणार आहे. बुधवारी भारतीय संघ येथे दाखल होईल त्यावेळी संघव्यवस्थापन याबाबत नक्की विचार करेल.
स्थानिक क्युरेटरच्या मते दव सायंकाळी ५.३० नंतर पडण्यास सुरुवात होते. सामन्याच्या दिवशीही असेच घडले तर नाणेफेक जिंंकून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लाभदायक ठरू शकते.
क्युरेटर पंकज पटनायक म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांमध्ये बरेच दव पडत आहे. रासायनिक स्पे्र, दोन सुपर सोपर आणि दोर याद्वारे दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. मैदानावरील हिरवळ आठ मिलिमीटर वरून सहा मिलिमीटरपर्यंत कापण्यात आली आहे. त्यामुळे दवबिंदू मातीत मुरण्यास मदत होईल. यापूर्वी या मैदानावर २०१४ मध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सरशी साधली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथे पहिल्या वन-डेमध्ये इंग्लंडने दिलेल्या ३५१ धावांचे लक्ष्य ७ गड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू राखून पूर्ण केले. दुसऱ्या लढतही मोठ्या धावसंख्येची होईल, अशी आशा आहे.
क्युरेटर म्हणाले, ‘माझ्यासाठी धावांबाबत भाकीत करणे कठीण आहे, पण नेहमीप्रमाणे यावेळीही येथे मोठी धावसंख्या उभारली जाईल. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असून फलंदाजांनी त्याचा लाभ घ्यावा.’ उभय संघ बुधवारी येथे पोहोचणार असून सायंकाळच्या सत्रात सराव करतील. मालिकेतील तिसरा व अखेरचा वन-डे सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणार आहे.

Web Title: India's 'Lucky' for ten years in Barabati ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.