भारताची पदकांची झोळी रिकामी
By Admin | Published: August 30, 2015 10:46 PM2015-08-30T22:46:42+5:302015-08-30T22:46:42+5:30
जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या उरल्यासुरल्या आशा लागून राहिलेल्या मॅरेथॉनमध्ये देखील भारतीय खेळाडूंना रिकाम्या
बीजिंग : जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या उरल्यासुरल्या आशा लागून राहिलेल्या मॅरेथॉनमध्ये देखील भारतीय खेळाडूंना रिकाम्या हातानेच परतावे लागले. ओपी जैशा ने महिला मॅरेथॉनमध्ये वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरी केल्यानंतरही तीला १८व्या स्थानी समाधान मानावे लागले. तर अनुभवी सुधा सिंगने १९ वे स्थान मिळवले. रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकही पदक मिळवण्यात यश आले नाही.
इंचिओन आशियाई स्पर्धेत १५०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या जैशाने २ तास ३४ मिनिट ४३ सेकंदाची वेल देत मॅरेथॉन पुर्ण केली. यावेळी तीने स्वत:चा २ तास ३७ मिनिट ३९ सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमामध्ये सुधारणा केली. जानेवारी महिन्यात झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जैशाने हा विक्रम नोंदवला होता.
त्याचवेळी जैशाच्या बरोबर मागे १९व्या स्थानी भारताच्या अनुभवी सुधा सिंगने स्थान मिळवले. तीने २ तास ३५ मिनिट ३५ सेकंदाची वेळ देताना शर्यत पुर्ण केली. विशेष म्हणजे यावेळी सुधाची कामगिरी देखील जैशाच्या आधीच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा वरचढ ठरली. दरम्यान, याआधीच रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या जैशानंतर सुधाने देखील या कामगिरीसह रिओचे तिकीट मिळवले. आॅलिम्पिक पात्रतेसाठी २ तास ४२ मिनिट अशी वेळ आवश्यक आहे.
त्याचवेळी या आठवड्यात ३००० मीटर स्टिपलचेज मध्ये दोनवेळा धावल्याने भारताची अव्वल धावपटू ललिता बाबरने मॅरेथॉनमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. इथोपियाच्या मेयर दिबाबाने २ तास २७ मिनिट ३५ सेकंदाची जबरदस्त वेळ नोंदवून मॅरेथॉनच्या सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर केनियाच्या हेला किप्रोप (२:२७.३६) आणि केनिया वंशाच्याच बहारीनचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या युनाइस जेपकिरुई (२:२७.३९) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)