भारताचे नवी मुंबईतील सामने दिल्लीला हलविले
By admin | Published: June 29, 2017 12:41 AM2017-06-29T00:41:07+5:302017-06-29T00:41:07+5:30
केंद्रीय सरकारने केलेल्या आग्रहाला मान्य करताना फीफाने आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे संघ
नवी दिल्ली : केंद्रीय सरकारने केलेल्या आग्रहाला मान्य करताना फीफाने आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे संघ नवी दिल्लीमध्ये खेळविण्यास मान्यता दिली आहे. याआधीच्या आखलेल्या कार्यक्रमानुसार भारतीय संघाचे सर्व सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार होते.
अखिल भारतीय फुटबॉल संघटनने (एआयएफएफ) याआधी भारताच्या साखळी सामन्यांचे यजमानपद नवी मुंबईला दिले होते. मात्र, नंतर क्रीडा मंत्रालयाच्या दबावामुळे त्यांनी फीफाला या सामन्यांचे आयोजन दिल्लीमध्ये हलविण्याचे सांगितले. क्रीडा मंत्रालयानुसार राजधानी दिल्लीमध्ये यजमान संघाचे सामने खेळविण्यात आले पाहिजे.
भारताचे सामने दिल्लीला हलविण्यात आलेल्या प्रक्रीयेला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे का, याबाबत विचारले असता फीफाचे स्पर्धा प्रमुख जैमी यार्जा यांनी सांगितले की, ‘आम्ही स्पर्धेसाठी सर्वात फायदेशीर निर्णयांवर काम करत आहोत. आम्ही भारत सरकारच्या आग्रहाकडे अत्यंत गांभिर्याने लक्ष देत आहोत, कारण फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामध्ये ते आमचे मुख्य सहकारी आहेत.’
एका विश्वासू सुत्राने दिलेल्या माहितीनुसार फीफाने ‘अ’ गटातील सामने दिल्लीला हलविण्यास प्रक्रीया सुरु केली असून ही प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धेतील सामने देशातील सहा शहरांमध्ये खेळविण्यात येतील.
यजमान या नात्याने भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात येईल. तसेच, चार संघांचा समावेश असलेल्या या गटात भारत आघाडीचा ‘ए वन’ संघ असेल.
‘अ’ गटातील सामन्याचे यजमानपद नवी मुंबईकडे होते. परंतु, भारत सरकारच्या आग्रहानंतर दिल्ली आता या सामन्यांचे यजमानपद भूषवेल. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईला ‘ब’ गटातील सामन्यांचे यजमानपद भूषविण्यात समाधान मानावे लागेल.