भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम

By admin | Published: July 24, 2016 09:43 AM2016-07-24T09:43:10+5:302016-07-24T11:26:04+5:30

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीच्या ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला आहे.

India's Neeraj Chopra set a world record | भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रचला विश्वविक्रम

Next

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. २४ - भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीच्या ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला आहे. शनिवारी पोलंडमध्ये झालेल्या आयएएएफ वर्ल्ड अंडर -२० चॅम्पियनशीप स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने ८६.४८ मीटर अंतरावर भालाफेकून ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला. 
 
८०.५९ मीटर अंतरावर भालाफेकणा-या दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रॉबलरने रौप्य तर, ७९.६५ मीटर अंतरावर भालाफेकून ग्रानाडाच्या अँडरसन पीटर्सने कास्यपदक पटकावले. अॅथलेटीक्समध्ये विश्वविक्रम रचणारा नीरज पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे तसेच वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणाराही तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. 
 
पहिल्या फेरीत नीरज ७९.६६ मीटर अंतरावर भालाफेकून दुस-या स्थानावर होता. पहिल्या प्रयत्नात ग्रॉबलरने ८०.५९ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. दुस-या प्रयत्नात नीरजने ८६.४८ मीटर अंतरावर भालाफेकून विश्वविक्रमाला गवसणी घातली. यापूर्वीचा ज्यूनियर गटातील विश्वविक्रम लाटव्हीयानच्या झिगीसमुंड सिरमायसच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये ८४.६९ मीटर अंतरावर भालाफेकला होता.  
 
हरयाणाच्या खंड्रा गावातील नीरजने मागच्यावर्षी ३१ डिसेंबर २०१५ रोजी पतियाळा येथे झालेल्या भालफेक स्पर्धेत ८१.०४ मीटर अंतरावर भालाफेकून लक्ष वेधून घेतले होते. नीरजचा ऑलिम्पिक प्रवेश थोडक्यात हुकला होता. अंडर-२० जागतिक स्पर्धेत मिळवलेले हे पहिले सुवर्णपदक आहे.
 
गत ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट केसहॉर्न वॉलकॉटपेक्षा नीरजने चांगची कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये वॉलकॉटने ८६.३५ मीटर अंतरावर भालाफेक केली आहे.  अॅथलेटीक्समध्ये सिनियर गटात फक्त अंजू बॉबी जॉर्ज पदकविजेती आहे. तिने २००३ मध्ये लांब उडीमध्ये कास्यपदक पटकावले होते. आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीरजने मिळवलेले हे यश ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणा-या अन्य खेळाडूंना प्रेरणादेणारे आहे. 
 

Web Title: India's Neeraj Chopra set a world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.