राहुल द्रविड, अभिनव बिंद्रा शोधणार भारताचे ऑलिंपिक रत्न
By admin | Published: July 25, 2014 02:56 PM2014-07-25T14:56:40+5:302014-07-25T15:09:55+5:30
ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढावी यासाठी नेमलेल्या 'टार्गेट मिशन ऑलिंपिक पोडीयम' समितीमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडसह अभिनव बिंद्रा आणि गोपीचंद यांचा समावेश आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - २०१६ मध्ये रिओ आणि २०२० मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिंपिकमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी क्रीडा मंत्रालयाने 'टार्गेट मिशन ऑलिंपिक पोडीयम' समितीची नेमणूक केली असून या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडसह अभिनव बिंद्रा आणि अनूराग ठाकूर यांचा समावेश आहे. ही समिती ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची निवड करणार आहे.
ऑलिपिंकमध्ये भारताला आत्तापर्यंत फक्त २६ पदक मिळाले असून यात नऊ सुवर्ण, सहा रौप्य आणि ११ कांस्य पदकाचा समावेश आहे. नऊ पैकी आठ सुवर्ण पदकं भारताच्या हॉकी संघानेच मिळवून दिली आहेत. ऑलिंपिकमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधार व्हावा यासाठी क्रीडा मंत्रालयाने टार्गेट मिशन ऑलिंपिक समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार अनूराग ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रवि्ड, ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलेवहिले वैयक्तीक सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्ष अशा आठ जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती देशातील ७५ ते १०० प्रतिभावान खेळाडूंची निवड करेल. यात बॅडमिंडन, अॅथेलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुश्ती या खेळांवर जास्त भर दिला जाईल. या सर्व खेळांमध्ये भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.
द्रविड, बिंद्रा या सारख्या खेळाडूंचा समितीमध्ये समावेश असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. २०१६ च्या रिओतील ऑलिंपिंकमध्ये भारताला दोन आकडी पदकं तर २०२० मध्ये २० पदकं देशाला मिळावीत हे आमचे उद्दीष्ट असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
अशी काम करेल समिती
निवड प्रक्रियेसाठी समितीला दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच केली जाईल. निवड प्रक्रियेसाठी व्यक्तीगत पातळीवर आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांकडून अर्ज मागवले जातील. यानंतर संबंधीत राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महासंघांचा सल्ला घेतला जाणार असून त्यानंतर त्या खेळाडूची पूर्ण माहिती घेतली जाणार आहे.
वर्षातून एकदा किंवा दोनदा निवड झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. या दरम्यान नवीन खेळाडूंचीही निवड करणे शक्य आहे. प्रतिभावान खेळाडूंची निवड झाल्यावर त्यांना उच्चदर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.