भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:01 AM2021-08-10T09:01:49+5:302021-08-10T09:02:39+5:30

चाहत्यांच्या गर्दीने घेरले खेळाडूंना; कोरोना निर्बधांचा उडाला फज्जा

Indias Olympic medallists receive a heros welcome | भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

Next

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे सोमवारी नवी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. या वेळी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी, विशेष करून सुवर्ण पदक विजेत्या नीरज यादवची छबी आपल्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागली. यामुळे विमानतळाबाहेर प्रचंड  गर्दी जमा झाली होती. 

भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साइ) महानिर्देशक संदीप प्रधान यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींच्या चमूने भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला हेही या वेळी उपस्थित होते. विमानतळावर पोहोचताच खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. टोकियो ऑलिम्पिक भारताची आतापर्यंतची सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक ठरली. यामध्ये भारताने सर्वाधिक ७ पदकांची कमाई केली.

विशेष म्हणजे नीरज कुमारने भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे नीरजची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी कोरोना निर्बंधामुळे अनिवार्य करण्यात आलेल्या सामाजिक अंतराचेही भान ठेवले नाही. भारताला कुस्तीत रौप्य पदक मिळवून देणारा रवी कुमार दहिया, ४ बाय ४०० मीटर शर्यतीत आशियाई विक्रम मोडणारा भारताचा पुरुष संघ यांचेही या वेळी जोरदार स्वागत करण्यात आले. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमात सर्व ऑलिम्पिकवीरांचा सन्मान केला.

भारत सरकारने ऑलिम्पिकवीरांचा एका शानदार कार्यक्रमामध्ये सत्कार केला. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रत्येक खेळाडूला गौरविण्यात आले. यावेळी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला तो नीरज चोप्रा. माजी क्रीडामंत्री आणि विद्यमान विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू, क्रीडा राज्य मंत्री निसिथ प्रामाणिक आणि साइच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

बजरंगसाठी जमली गर्दी
कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या कुस्तीगीर बजरंग पुनियासाठीही मोठी गर्दी जमली होती. बजरंगने एका एसयूव्हीच्या सनरुफमधून बाहेर येत हात उंचावून आपल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. या वेळी अनेकांनी सामाजिक अंतराचे नियम झुगारून देत बजरंगच्या गाडीजवळ प्रचंड गर्दी केली. 

...म्हणून इतर खेळाडू लवकर परतले होते
यंदाच्या ऑलिम्पिकवर कोरोनाचा प्रभाव दिसून आला. खेळाडूंना बायो-बबलसह अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. कोरोना निर्बंधानुसार प्रत्येक खेळाच्या पदक वितरण समारोपानंतर त्या-त्या खेळातील खेळाडूंना ४८ तासांमध्ये टोकियो सोडायचे होते. त्यामुळेच मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू हे पदक वितरण सोहळ्यानंतर लगेच भारतात परतले होते.

Web Title: Indias Olympic medallists receive a heros welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.