आवेश-लोमरोर यांच्या कामगिरीने भारत उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: January 31, 2016 03:09 AM2016-01-31T03:09:24+5:302016-01-31T03:09:24+5:30

सर्फराज खान (७४) याचे आणखी एक शानदार अर्धशतक आणि आवेश खान (३२ धावांत ४ बळी) आणि महिपाल लोमरोर (४७ धावांत ५ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर

India's performance in the quarter-finals of the thriller | आवेश-लोमरोर यांच्या कामगिरीने भारत उपांत्यपूर्व फेरीत

आवेश-लोमरोर यांच्या कामगिरीने भारत उपांत्यपूर्व फेरीत

Next


मिरपूर : सर्फराज खान (७४) याचे आणखी एक शानदार अर्धशतक आणि आवेश खान (३२ धावांत ४ बळी) आणि महिपाल लोमरोर (४७ धावांत ५ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा शनिवारी एकतर्फी लढतीत १२० धावांनी धुव्वा उडवत आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या ‘ड’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
भारताने ८ बाद २५८ अशी मजबूत धावसंख्या उभारल्यानंतर न्यूझीलंडला ३१.३ षटकांतच १३८ धावांत गुंडाळले. आवेश खानने न्यूझीलंडच्या आघाडीच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले, तर लोमरोर याने मधल्या आणि तळातील फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला.
१0 षटकांत ३२ धावांत ४ गडी बाद करणारा मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज आवेश सामनावीर ठरला. डावखुरा फिरकी गोलंदाज लोमरोरने त्याची सर्वोत्तम कामगिरी करीत ७.३ षटकांत ४७ धावा देत ५ गडी बाद केले. जिशान अन्सारीने १९ धावांत १ गडी बाद केला. भारताचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. दोन्ही संघांत आता १ फेब्रुवारी रोजी गटातील अखेरचा सामना होणार आहे. त्यावर गटातील अव्वल संघ ठरणार आहे.
आवेशच्या भेदक गोलंदाजीने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने ११ व्या षटकापर्यंत ४ फलंदाज १६ धावांत गमावले होते. न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. न्यूझीलंडचे ८ फलंदाज ८८ धावांत तंबूत परतले; परंतु पारीख आणि स्कॉटने त्यांच्या संघाला १३८ पर्यंत पोहोचवले. त्याआधी भारताची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी त्यांचे दोन फलंदाज १९ धावांत गमावले. कर्णधार ईशान किशन ४ आणि रिकी भुई एका धावेवर बाद झाला. त्यानंतर सर्फराजने रिषभ पंतच्या साथीने ८९ धावांची भागीदारी केली. पंतने ८३ चेंडूंत ५७ धावांत ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर सर्फराजने अरमान जाफर (४६)च्या साथीने चौथ्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकांत ८ बाद २५८. (सर्फराज खान ७४, रिषभ पंत ५७, अरमान जाफर ४६, लोमरोर ४५. जॅक गिब्सन ३/५0, नाथन स्मिथ २/३९, रचिन रवींद्र २/४१).
न्यूझीलंड : ३१.१ षटकांत सर्व बाद १३८. (फिन अ‍ॅलन २९, क्रिस्टियन लियोपार्ड ४0, अनिकेत पारीख २६, टेलर स्कॉट २९. आवेश खान ४/३२, महिपाल लोमरोर ५/४७).

Web Title: India's performance in the quarter-finals of the thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.