भारताची कामगिरी उंचावेल!
By admin | Published: August 19, 2015 11:18 PM2015-08-19T23:18:59+5:302015-08-19T23:18:59+5:30
पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल
कोलंबो : पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल, तर दुसरीकडे श्रीलंका त्यांचा महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न करील.
भारत गॅले येथील पहिल्या कसोटीत वर्चस्व निर्माण केल्यानंतरही ६३ धावांनी पराभूत झाला. आक्रमकतेच्या दृष्टिकोनानंतरही भारतीय खेळाडू आवश्यकतेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले.
मधल्या फळीतील फलंदाज दिनेश चांदीमलच्या आक्रमक शतकानंतर भारतीय संघाजवळ पर्यायी व्यूहरचनेचा अभाव होता. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडमध्ये मोईन अली आणि आॅस्ट्रेलियाच्या नाथन लियोनदेखील त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. या दोन दौऱ्यांतील ९ कसोटींत भारतीय फलंदाजांनी दोन फिरकी गोलंदाजांसमोर ४२ विकेट गमावल्या. गॅले कसोटीत १५ बळी हे फिरकी गोलंदाजांनी घेतले. त्यामुळे १० सामन्यांमध्ये भारताचे (बांगलादेशविरुद्ध अनिर्णीत कसोटी सोडून) ५७ फलंदाज फिरकी गोलंदाजीसमोर बाद झाले.
पी. साराच्या खेळपट्टीवर उसळी अधिक आहे; परंतु ती फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असणार आहे. उद्या भारतीय संघाचा फोकस हा निवडीवर असणार आहे. काल सलामीवीर मुरली विजयने नेटवर सहजपणे फलंदाजी केली. त्याने सरावादरम्यान फुटबॉलही खेळला. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. तो जखमी शिखर धवनची जागा घेणार आहे. शिखर धवन जखमी असल्यामुळे पूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.
पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतरही रोहित शर्मा संघात खेळणे निश्चित मानले जात आहे आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चेतेश्वर पुजाराही सरावात व्यस्त होता. आता फोकस हा अंतिम अकरा जणांची निवड करण्यावर असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी पाच गोलंदाजांसह उतरण्याविषयीचा पुनरुच्चार केला आहे; परंतु गॅलेत पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी ही अव्वल चार गोलंदाजांना रोटेट करण्यासाठी असणार आहे. हरभजनसिंगसारख्या अनुभवी खेळाडूला ही भूमिका पार पाडता आली नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी कमजोर झाली.
दुसऱ्या कसोटीच्या उंबरठ्यावर बोलावण्यात आलेला स्टुअर्ट बिन्नीदेखील दुसऱ्या कसोटीत खेळू शकतो. भारतालाही अष्टपैलू खेळाडूची नितांत आवश्यकता आहे; परंतु तो अपेक्षेला खरा उतरतो का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत चार कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे; परंतु त्याला अद्यापही विजयाची चव चाखता आलेली नाही. अॅडेलमध्ये तो दोनदा पराभूत झाला आणि गॅले येथे विजयानजीक पोहोचूनही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
गेल्या वेळी २०१० मध्ये भारताने येथे श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. या कसोटीत वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शतक ठोकले होते. त्या वेळेस संघात ईशांत शर्मा, मुरली विजय आणि अमित मिश्रादेखील होते. मिश्राने गॅले येथील कसोटीत ६ षटकांत २० धावा देऊन दोन आणि ६१ धावांत ३ गडी बाद केले.
भारत व श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत ३६ कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारताने १४ लढतींमध्ये विजय नोंदविला असून ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. १५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय,
के. एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिधिमान साहा, आर. आश्विन, हरभजनसिंग, अमित मिश्रा,
ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन,
स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कौशल सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कौशल परेरा, रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामिरा (तंदुरुस्त ठरल्यास).
(वृत्तसंस्था)